जाहिरात
This Article is From Aug 26, 2024

बदलापूर प्रकरणात मोठी अपडेट; शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिकेभोवती कायद्याचा फास!

बदलापुरातील (Badlapur Child Abuse) चिमुरडीवर झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

बदलापूर प्रकरणात मोठी अपडेट; शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिकेभोवती कायद्याचा फास!
बदलापूर:

बदलापुरातील (Badlapur Child Abuse) चिमुरडीवर झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना देखील आरोपी करण्यात आले असून ते फरार असल्याची माहिती आहे. 

बदलापुरातील शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याची आज पोलीस कोठडी संपली. त्यामुळे त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 14  दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय या प्रकरणातील कलमांमध्ये वाढ केली असून कलम 6 आणि 21 वाढवण्यात आले आहे. यात 20 वर्षे किंवा आजन्म कारावास होऊ शकतो. शिवाय शाळेच्या मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष, आणि सेक्रेटरी यांना आरोपी करण्यात आले असून ते फरार आहेत. त्यांना या प्रकरणात कधी ही अटक होण्याची शक्यता आहे. आरोपी अक्षय शिंदेला मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. 

नक्की वाचा - बदलापूरच्या 'त्या' शाळेच्या संचालक मंडळात भाजपसह शिवसेना आणि ठाकरे गटाचेही नेते

या प्रकरणात शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल  (20 वर्षे अध्यक्ष आणि पदाधिकारी) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सचिव तुषार आपटे (20 वर्षे सचिव) - अपक्ष यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्याविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सर्वांभोवतीही कलम कठोर असून यात 20 वर्षे किंवा आजन्म कारावास होऊ शकतो.