भारतीय जनता पार्टीच्या वतीने 1 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2026 या कालावधीत देशभरात 'सेवा दूत अभियान' राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी पनवेल येथे आयोजित ठाणे-कोकण विभागीय कार्यशाळेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीवर भर
या कार्यशाळेत 'सेवा दूत अभियाना'ची कार्यपद्धती, बूथ पातळीवरील सूक्ष्म नियोजन आणि अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे आवाहन रविंद्र चव्हाण यांनी केले.
लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट
उपस्थितांना मार्गदर्शन करताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेणे, त्यांना आवश्यक ते सहकार्य करणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या विभागीय कार्यशाळेस प्रदेश सरचिटणीस आ. माधवीताई नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रमोद जठार, आमदार विक्रांत पाटील आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह ठाणे व कोकण विभागातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world