Nagpur Crime News: नागपूर जिल्ह्यात बेकायदेशीर गांजा तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या काटोल ग्रामीण अध्यक्षासह एकूण सहा जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अटकेतील आरोपी कोण?
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये वैभव काळे याचा समावेश आहे. वैभव काळे हा केवळ भाजप युवा मोर्चाचा काटोल ग्रामीण अध्यक्षच नाही, तर तो डोरली (भांडवलकर) येथील सरपंच देखील आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीचे थेट गांजा तस्करी आणि एनडीपीएस कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कृत्यांमध्ये नाव आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला समीर राऊत हा देखील शेर भगतसिंग या सामाजिक संघटनेचा पदाधिकारी आहे.
(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)
पोलिसांची संयुक्त कारवाई
गांजा तस्करीची माहिती मिळताच काटोल पोलीस आणि एनडीपीएस सेल यांच्या संयुक्त पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक केली आहे, तर या रॅकेटमधील फरार असलेल्या दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी 33.600 किलो वजनाचा गांजा जप्त केला, ज्याची किंमत 6 लाख 72 हजार रुपये इतकी आहे. यासह साहित्य आणि वाहनांचा समावेश असून, जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 17 लाख रुपये इतकी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world