
मुंबईकर नागरिकांना आता विविध प्रकारच्या रक्त चाचण्या (Blood Test) अत्यंत कमी दरात उपलब्ध होणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'आपली चिकित्सा योजना' (Aapli Chikitsa Yojana) 1 ऑगस्ट 2025 पासून पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही योजना सुरुवातीला 100 आरोग्य संस्थांमध्ये सुरू होईल आणि 15 ऑगस्ट 2025 पर्यंत महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये (BMC Clinics) उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे.
83 प्रकारच्या चाचण्या करता येणार
'आपली चिकित्सा' ही बीएमसीची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याचा उद्देश नागरिकांना आरोग्य संस्थांमध्ये बाह्यस्रोताद्वारे नाममात्र दरात रक्त चाचणी सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना रक्त चाचणी अहवाल व्हॉट्सअॅपवर देखील मिळणार आहेत. यामुळे रिपोर्ट मिळवण्यासाठी रुग्णांना पुन्हा आरोग्य संस्थेत जाण्याची गरज भासणार नाही.
( नक्की वाचा: भारतीयांना जपानी भाषा शिकवण्यासाठी धडपड; रोजगार,व्यवसायाच्या अफाट संधी खुल्या होणार )
बीएमसी आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पश्चिम उपनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यात मूलभूत आणि प्रगत अशा 83 तपासण्यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या 66 मूलभूत तपासण्या आणि तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार 17 प्रगत तपासण्यांचा समावेश आहे.
कुठे उपलब्ध आहे सेवा ?
या योजनेत बीएमसीची उपनगरीय रुग्णालये, दवाखाने, आपला दवाखाना, पॉलिक्लिनिक, प्रसूतिगृहे तसेच विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय आणि जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालय यांचा समावेश आहे.जून 2025 मध्ये बीएमसीमार्फत राबवलेल्या निविदा प्रक्रियेनुसार 'लाइफनिटी हेल्थ' या संस्थेची सेवा पुरवठादार म्हणून निवड करण्यात आली आहे.
( नक्की वाचा: 16 वर्षांच्या मुलाला दिली होती 'ती' गोळी, विद्यार्थ्यावर अत्याचार करणाऱ्या शिक्षिकेच्या मैत्रिणीला अटक )
1 ऑगस्ट 2025 पासून खालील ठिकाणी ही सेवा कार्यान्वित होणार आहे
16 उपनगरीय रुग्णालये
30 प्रसूतिगृहे
5 विशेष रुग्णालये
डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय
एचएचबीटी ट्रॉमा रुग्णालय
विभाग 'ए' ते 'ई' मधील सर्व महानगरपालिका दवाखाने
आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणालीद्वारे सर्व रुग्णांच्या माहितीचे संकलन आणि व्यवस्थापन केले जाणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world