
प्रकल्पबाधित नागरिकांच्या निवासासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुलुंड (पूर्व) येथे ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प' अंतर्गत सुमारे 30 हजार 954 चौरस मीटर क्षेत्रफळावरील 5 इमारतींमध्ये 6 हजार 731 सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. या सदनिकांचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण करावे. जेणेकरून, त्या लवकरात लवकर प्रकल्पबाधितांना सुपूर्द करता येतील. तसेच, प्रकल्पाच्या ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
कसा आहे गृहप्रकल्प ?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प' अंतर्गत मुलुंड (पूर्व) येथे प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येत असलेल्या सदनिकांची भूषण गगराणी यांनी आज (दिनांक 12 जून 2025) प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. प्रकल्पबाधित नागरिकांच्या निवासासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुलुंड (पूर्व) येथे ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प' अंतर्गत सुमारे 30,954 चौरस मीटर क्षेत्रफळावर 5 इमारती बांधण्यात येत आहेत. यामध्ये, तळमजला + 22 मजल्यांच्या 4 इमारती तर तळमजला + 25 मजल्याच्या एका इमारतीचा समावेश आहे. या ५ इमारतींमध्ये मिळून एकूण 6 हजार 731 सदनिका प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येत आहेत. प्रत्येक सदनिकेचे क्षेत्रफळ 300 चौरस फूट असून त्यामध्ये बैठक, शयनकक्ष (संलग्नित पाश्चिमात्य शैलीचे स्वच्छतागृह), स्वयंपाकघर, सामाईक स्वच्छतागृह (कॉमन बाथरुम) यांचा समावेश आहे. तसेच, प्रकल्पाच्या परिसरात मनोरंजन मैदान, शाळा, सामुदायिक सभागृह, वाचनालय, आरोग्य केंद्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) आदी सुविधांही पुरवण्यात येणार आहेत.
पालिका आयुक्तांनी केली पाहणी
या पार्श्वभूमीवर, बांधकामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पालिका आयुक्त गगराणी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यामध्ये त्यांनी सदनिकांच्या आतमधील संरचना; पाणी, स्वच्छतागृह, वीज, लिफ्ट, पायऱ्या, अग्निसुरक्षाविषयक उपाययोजना आदींची गुणवत्ता तसेच त्यासंबंधित महत्त्वपूर्ण बाबींची अत्यंत बारकाईने पाहणी केली आणि एकंदर प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. दरम्यान, प्रकल्पाच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या दर्जेदार सुरक्षाविषयक बाबींसाठी भारतीय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प' यास सन 2023 वर्षीचा ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार' प्राप्त झाल्याबद्दलही त्यांनी संबंधितांचे कौतुक केले.
वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
सदनिकांचे बांधकाम योग्यप्रकारे आणि दर्जेदारपणे सुरू आहे. तथापि, याठिकाणी वास्तव्यास येणाऱ्या प्रकल्पबाधित नागरिकांना अन्य आवश्यक सोयीसुविधांचीही विहित वेळेत पूर्तता करावी. तसेच, सदनिकांचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण करुन या सदनिका त्यांना लवकरात लवकर उपलब्ध करुन दिल्या जातील, यासाठी योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही गगराणी यांनी यावेळी दिल्या.
‘टी‘ वॉर्ड कार्यालयाला भेट
मुलुंड स्थित ‘टी‘ वॉर्ड कार्यालयास देखील बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात जाऊन तेथील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, तिथे प्रत्यक्ष पुरविल्या जात असलेल्या विविध सेवा-सुविधांची माहिती जाणून घेतली. ‘टी' विभागाच्या सहायक आयुक्त योगिता कोल्हे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world