मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दररोज 10 हजार रुपये बक्षिस आणि आठवड्याला 50 हजार रुपये बक्षिस जिंकण्याची संधी आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या लकी यात्री योजना या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांना ही संधी मिळणार आहे. त्यामुळे नियमित लोकल ट्रेन प्रवास अधिक फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. यामध्ये रोज एका भाग्यवान तिकीट धारकाला 10 हजार रुपये रोख बक्षीस आणि आठवड्याला 50 हजार रुपयांचे बंपर बक्षीस देण्याचे आश्वासन दिले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मध्य रेल्वेची ही योजना पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तर पुढील आठ आठवडे ही योजना चालेल. तिकीट किंवा सीझन पाससह प्रवास करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. FCB इंटरफेस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडद्वारे प्रायोजित असल्याने या योजनेचा आर्थिक भार प्रवाशांवर येणार नाही.
(नक्की वचा- HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदवाढ; वाहनधारकांचं टेन्शन मात्र कायम, काय आहे कारण?)
मध्ये रेल्वेवर दररोज सरासरी दररोज 40 लाख प्रवासी प्रवास करतात. ढोबळ अंदाजानुसार, विना तिकीट प्रवास करणारे 20 टक्के प्रवासी तपासणीदरम्यान पकडले जातात. दररोज 4000 ते 5000 तिकीट नसलेले प्रवासी पकडले जातात. प्रवाशांना तिकिटे खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि नियमित प्रवाशांना बक्षीस देण्यासाठी हा उपक्रम आखण्यात आला आहे. दररोज एक तिकीटधारक 10 हजार रुपये जिंकेल. तर दर आठवड्याला निवडलेल्या विजेत्याला 50 हजार रुपये बक्षीस दिले जाईल, असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितलं.
(नक्की वाचा- पुणेकरांचं आरोग्य धोक्यात, 79 ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य; अहवालातून धक्कादायक माहिती समोर)
विजेत्यांची निवड कशी केली जाणार?
विजेत्याची निवड तिकीट तपासनीस स्टेशनवर करतील. भाग्यवान प्रवाशांना वैध तिकीट किंवा सीझन पास सादर करण्यास सांगितले जाईल. पडताळणीनंतर, रोख बक्षीस ताबडतोब दिले जाईल, असंही निला यांनी सांगितलं. तिकीट काढून प्रवास करणारे किंवा सीजन पास काढून प्रवास करणारे अशा सर्वांसाठी ही योजना खुली आहे. तिकीट काढण्याचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वेने अनेक उपक्रम सुरू केले आहेत. ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन व्यतिरिक्त मोबाइल तिकीट अॅप्स देखील रेल्वेने सुरू केले आहेत.