जाहिरात

चंद्रपूरमधल्या घडामोडींबद्दल संजय राऊतांना अंधारात ठेवलं? युवा नेत्याने केला करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा

संजय राऊत यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सुपर उद्धव ठाकरे असा उल्लेख केला होता. हा उल्लेख या युवा आमदाराबद्दलच केला असावा असा अंदाज बांधला जातोय.

चंद्रपूरमधल्या घडामोडींबद्दल संजय राऊतांना अंधारात ठेवलं? युवा नेत्याने केला करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा
मुंबई:

चंद्रपूरमध्ये गेल्या काही दिवसांत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या जास्त असतानाही तिथे काँग्रेस आपला महापौर बसवू शकली नाही. भाजपने कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आपल्यासोबत घेत आपला महापौर बसवला. चंद्रपूरमध्ये घडलेल्या या घडामोडींचे पदसाद मुंबईत उमटायला लागले आहेत.  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करणाऱ्या मनसेने चंद्रपूरमधील या घडामोडींवरून ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचायला सुरूवात केली आहे. 

नक्की वाचा: 'तुमचे ते चंद्रपूर ,आमचे ते डोंबिवली ? वाह रे वाह!', मनसेने ठाकरे सेनेला डिवचले

संजय राऊतांना अंधारात ठेवलं ?

चंद्रपूर कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा द्यायचा नाही अशी शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची ठाम भूमिका होती. ज्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला, त्या दिवशीही शिवसेना (उबाठा) प्रवक्ते संजय राऊत यांनी ही भूमिका बोलून दाखवली होती. मात्र त्याच दिवशी शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या सगळ्या घडामोडींची उद्धव ठाकरेंना नीट कल्पना होती असं सांगितलं होतं. यामुळे संजय राऊत यांना ठेच लागली होती. मात्र खरी ठेच त्यांना त्याआधीच लागली होती अशी चर्चा सुरू आहे. शिवसेनेतील एका युवा आमदार हा चंद्रपुरातील पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होता आणि या आमदाराच्या माध्यमातूनच भाजपशी बोलणी झाली होती. या चर्चांबद्दलची माहिती उद्धव ठाकरेंनाही होती असे सांगितले जाते, मात्र याला अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आलेला नाही.    

'सुपर' उद्धव ठाकरे कोण ?

संजय राऊत यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सुपर उद्धव ठाकरे असा उल्लेख केला होता. हा उल्लेख या युवा आमदाराबद्दलच केला होता असे कळतंय.  संजय राऊत यांनी म्हटले की, "काँग्रेसने शिवसेनेशी अधिक गंभीरतेने चर्चा करणं गरजेचं होतं. दुर्दैवाने काँग्रेसच्या दोन गटात एकवाक्यता शेवटपर्यंत झाली नाही. आम्ही त्यासंदर्भात वरिष्ठांशी बोललो, धानोरकर, वडेट्टीवार यांच्याशीही बोलणं झालं. तरीही त्या दोघांमधलं मिटत नाही आणि स्थानिक राजकारणात उलथापालथ झालं आणि त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. यात स्वत:उद्धव ठाकरे लक्ष घालत आहेत. एक सांगतो की कोणत्याही स्थितीत भाजपला मदत करण्याची भूमिका उद्धव ठाकरेंची नव्हती, आजही नाही. ज्या भाजपने बाळासाहेब  ठाकरेंचा पक्ष फोडला.चिन्ह चोरायला मदत केली अशा चोरांना पाठिंबा देऊन सत्तेवर आणू नका हे उद्धव ठाकरेंचे स्पष्ट आदेश चंद्रपूरसाठी होते. या उपर कोणी सुपर उद्धव ठाकरे झाले असले तर माहिती नाही."

चंद्रपुरातील घडामोडी राऊतांना माहिती होत्या, मनसेचा दावा

चंद्रपूरमध्ये जे काही घडलं ते संजय राऊत यांना आधीपासून माहिती होतं असा दावा मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला आहे. सुपर उद्धव ठाकरे कोण? असा प्रश्न विचारला असता देशपांडे यांनी म्हटले की, 'सुपर उद्धव ठाकरेंचं नाव का घेत नाही ? सुपर प्रवक्त्यांनी नाव घ्यावं.' 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com