
"माझे पसंतीचे सिडकोचे घर" या योजनेची लॉटरी 15 फेब्रुवारीला काढण्याचे निश्चित झाले होते. पण सिडकोने ऐन वेळी ही लॉटरी पुढे ढकलली. अचानक सिडकोने घेतलेल्या या निर्णयानंतर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली. अर्जदारांनी संतापही व्यक्त केला. सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटले. अर्जदारांचा हा रोष पाहाता सिडकोनेही काही तासात लॉटरीची नवी तारीख जाहीर केली आहे. शिवाय ही लॉटरी किती वाजता आणि कुठे होणार आहे हे ही जाहीर केले आहे. त्यामुळे आता त्या दिवशी तरी लॉटरी निघते का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिडकोची माझे पसंतीचे सिडकोचे घर" या योजनेची लॉटरी आता शिवजयंतीला म्हणजेच 19 फेब्रुवारीला होणार आहे. ही सोडत दुपारी 2 ते 4 या कालावधीत होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत ही लॉटरी काढत असल्याचे यावेळी सिडकोने स्पष्ट केले आहे. संगणकीय सोडत वेबकास्टींगच्या माध्यमातून प्रक्षेपित केली जाणार आहे. शिवाय तळोजा, खारघर आणि खांदेश्वर या सिडकोच्या अनुभव केंद्रांवर या सोडतीचे लाईव्ह प्रक्षेपण पाहात येणार आहे. ही सोडत 15 फेब्रुवारीला होणार होती. मात्र आता ती 19 तारखेला होईल.

भोंगळ कारभार कसा करावा हे सिडकोने दाखवून दिलं होतं. "माझे पसंतीचे सिडकोचे घर" या योजनेतील 26,000 घरांची लॉटरी आज म्हणजे 15 फेब्रुवारीला निघणार होती. त्याची अधिकृत घोषणा ही सिडकोने पंधरा दिवस आधीच केली होती. सर्व पात्र अर्जदारांना लॉटरीसाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण ही देण्यात आले होते. त्याबाबत एसएमएस पाठवले गेले होते. अनेकांनी लॉटरीसाठी सुट्टी ही काढली होती. आपल्या स्वप्नातले घर साकार होणार हे स्वप्न घेवून लॉटरीसाठी अनेक जण गेले ही होते. पण त्यांच्या पदरी निराशा पडली. ऐन वेळी अर्जदारांना लॉटरी रद्द झाल्याचे सांगण्यात आले. ही लॉटरी पुढे ढकलली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे घराचं स्वप्न डोळ्यात घेवून आलेल्या अर्जदारांचा हिरमोड झाला. त्यानंतर अर्जदारांनी सिडकोच्या नावाने खडे फोडल्याचे दिसून आले.
सिडकोने 12 ऑक्टोबर 2024 ला "माझे पसंतीचे सिडकोचे घर" गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ केला होता. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील विविध नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता 26,000 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. अर्जदारांना आपल्या पसंतीच्या 15 सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, खारघर पूर्व (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये ही घरे आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world