- नवी मुंबई शहर सिडकोच्या माध्यमातून देशाच्या नगर नियोजनाला नवीन दिशा देत आहे
- सिडको देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना उभारणार आहे.
- हा प्रकल्प संगीतसभा, आंतरराष्ट्रीय क्रीडा कार्यक्रम आणि सांस्कृतिक महोत्सवांसाठी असेल.
राहुल कांबळे
दूरदर्शी नियोजनाद्वारे व विशिष्ट उद्देशाने विकसित करण्यात आलेले नवी मुंबई हे देशाच्या नगर नियोजनाला नवीन दिशा देणारे शहर ठरले आहे. भविष्यातील शहर म्हणून संकल्पित असलेली नवी मुंबई वर्तमानातील शहर म्हणून दिमाखाने झळकत आहे. हे परिवर्तन घडवून आणण्यासह देशातील थेट करमणूक क्रांती (live entertainment revolution) चा केंद्रबिंदू म्हणून नवी मुंबईला नावारूपाला आणत असल्याचा सिडकोला सार्थ अभिमान आहे. या संदर्भातील एक महत्त्वाचे पाऊल सिडको उचलत आहे. देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना उभारला जाणार आहे. नवी मुंबईमध्ये ते उभारले जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
“नवी मुंबईला जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र व उत्कृष्ट शहर म्हणून प्रस्थापित करण्याचा सिडकोला सार्थ अभिमान आहे. देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना उभारणीसाठी सुरू करण्यात आलेली प्रक्रिया ही आगामी सांस्कृतिक आणि आर्थिक क्रांतीचा पाया आहे. या प्रकल्पाद्वारे जागतिक दर्जाची करमणूक भारतीयांकरिता खुली होणार आहे. कलाकार, उद्योजक आणि स्थानिक समूहांकरिता व्यापक प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. नवी मुंबईचे जागतिक नकाशावरील स्थान अधिक बळकट होणार आहे. प्रत्येक टप्प्यावर कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी असलेली सिडकोची कटिबद्धता अधोरेखित होत आहे असं या निमित्ताने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितलं.
न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्व्केअर गार्डन आणि लंडन येथील ओटू अरेना या बहुउद्देशीय नाट्यगृहांपासून प्रेरणा घेऊन विकसित
करण्यात येणारा हा प्रकल्प आहे. देशातील करमणूक पायाभूत सुविधांमध्ये नवीन मानदंड प्रस्थापित करणार आहे. रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतसभा, आंतरराष्ट्रीय क्रीडाविषयक कार्यक्रम, भव्य स्तरावरील सांस्कृतिक महोत्सव आणि आभासी अनुभव (immersive productions) घेता येणार आहे. आयोजनाकरिता 20,000 प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था आणि 25,000 उभे प्रेक्षक इतकी क्षमता या ठिकाणी असणार आहे. यामुळे हा देशातील पहिला जागतिक दर्जाचा व भव्य क्षमता असणारा इनडोअर अरेना असणार आहे.
नक्की वाचा - Viral Video: ट्रेनमध्ये होतेय दारूची खुलेआम विक्री, गुटखा, पानमसाला सोबत मिळतय बरच काही
उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित हितसंबधींसोबत (Stakeholders) भागीदारी करून जागतिक दर्जाचे ज्ञान व परिचालन क्षमता आणून देशातील करमणूक क्षेत्राच्या भविष्याला आकार देण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. हा उपक्रम केवळ अरेना विकसित करण्यापुरता मर्यादित नसून सांस्कृतिक व आर्थिक चळवळीची ही सुरुवात आहे. या प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, पर्यटनाला चालना, नवीन उद्योगांच्या संधींची निर्मिती होणार असून देशातील थेट करमणूक, जागतिक कार्यक्रम आणि आभासी अनुभव प्रदान करणारे अग्रणी शहर म्हणून नवी मुंबईचे देशामध्ये स्थान निर्माण होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world