जाहिरात

Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकरी-नागरिकांना काय मोबदला मिळणार, सर्व फायद्यांची यादी समोर

Purandar Airport News: पुरंदर विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी किती मोबदला मिळणार? वाचा संपूर्ण यादी....

Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकरी-नागरिकांना काय मोबदला मिळणार, सर्व फायद्यांची यादी समोर
"Purandar Airport News: पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांना कोणता लाभ मिळणार?"
प्रतिकात्मक फोटो (Canva)

Purandar Airport News: पुणे शहरात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुरंदर आणि परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) किमान दोन टक्क्यांची वाढ होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या बाधित सात गावातील ग्रामस्थांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. 

पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना कोणकोणते लाभ मिळणार आहेत, याबाबत बैठकीत सांगण्यात आलेली माहिती जाणून घेऊया...

1. पुरंदर विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
2. पुरंदर येथील एरोसिटी प्रकल्पामध्ये टीडीआर संदर्भातील सर्व लाभ दिले जातील. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना शंभर टक्के नोकरीत प्राधान्य दिले जाईल. 
3. भूसंपादनाचा दर अंतिम झाल्यानंतर त्या भागातील युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करून उद्योगांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. 
4. तसेच प्रकल्पासंदर्भातील पूर्वी झालेल्या आंदोलनातील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील.
5. पुरंदर प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांच्या योग्य पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य आहे. 
6. शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पुढील पिढीला संरक्षण मिळेल, याचा विचार करून मूळ जमिनीच्या दरापेक्षा जास्त दर देण्याचा विचार करण्यात येईल. 
7. त्यासाठीच रेडिरेकनरनुसार भूसंपादन न करता वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचा दर ठरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

Pune News: पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत काय निर्णय? CM फडणवीसांनी दिली मोठी माहिती

(नक्की वाचा: Pune News: पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत काय निर्णय? CM फडणवीसांनी दिली मोठी माहिती)

8. सिडकोच्या प्रकल्पात यापूर्वी 22.50 टक्के लाभ देण्यात आला असून पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी त्याहून अधिक लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
9. प्रकल्पबाधित घरांसाठी कुटुंबाची रचना लक्षात घेऊन पुनर्वसन करण्यात येत असून यामध्ये सज्ञान मुलांसाठी अतिरिक्त जागा देण्यात येते. 
10. कुटुंबांतील बहिणीच्या हिश्यासंदर्भातही योग्य मार्ग काढण्यात येईल. अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी काही वेगळे करता येईल का याचा विचार करण्यात येईल. 
11. पुरंदर विमानतळासाठी संपादित जमिनीचा मोबदला तसेच पर्यायी जमीन देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com