Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (23 डिसेंबर) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पुरंदर विमानतळासंदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित 7 गावातील ग्रामस्थांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. या विमानतळामुळे पुणे आणि परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. हे केवळ प्रवासी विमानतळ नसून कार्गो विमानतळही असल्याने नाशवंत मालाच्या व्यापारासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुरंदर आणि परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) किमान दोन टक्के वाढ होईल.
भूसंपादनाचा जास्तीत जास्त मोबदला देणार
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस असंही म्हणाले की, पुरंदर येथील विमानतळ प्रकल्प व्यवहार्य होण्याच्या दृष्टीने सर्व बाबींचा सखोल विचार करून या विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
पुरंदर येथील एरोसिटी प्रकल्पामध्ये टीडीआर संदर्भातील सर्व लाभ दिले जातील. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत 100% प्राधान्य दिले जाईल. भूसंपादनाचा दर अंतिम झाल्यानंतर त्या भागातील युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करून उद्योगांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. तसेच प्रकल्पासंदर्भात पूर्वी झालेल्या आंदोलनातील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
(नक्की वाचा: Pune PMC Elections 2026: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, मुहूर्तही ठरला; राजकारणाचे वारे फिरणार)
पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य
पुरंदर प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि नागरिकांच्या योग्य पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य आहे. शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पुढील पिढीला संरक्षण मिळेल, याचा विचार करून मूळ जमिनीच्या दरापेक्षा जास्त दर देण्याचा विचार करण्यात येईल. त्यासाठीच रेडिरेकनर नुसार भूसंपादन न करता वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचा दर ठरविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कुटुंबातील बहिणीच्या हिश्याबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?
प्रकल्पबाधितांच्या घरांसाठी कुटुंबाची रचना लक्षात घेऊन पुनर्वसन करण्यात येत असून यामध्ये सज्ञान मुलांसाठी अतिरिक्त जागा देण्यात येते. कुटुंबातील बहिणीच्या हिश्यासंदर्भातही योग्य मार्ग काढण्यात येईल. अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी काही वेगळे करता येईल का याचा विचार करण्यात येईल. पुरंदर विमानतळासाठी संपादित जमिनीचा मोबदला तसेच पर्यायी जमीन देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा
पुरंदर विमानतळ परिसरात स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून, यापूर्वी संपादित केलेल्या अतिरिक्त जमिनीवरील शिक्के काढण्यात येतील. या प्रकल्पात शेतकऱ्यांना भागधारक करण्यासंदर्भातही विचार केला जाईल. गावठाण पुनर्बांधणीसंदर्भातही योग्य निर्णय घेतला जाईल. प्रकल्पबाधितांना विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच बागायती झाडांच्या दरासंदर्भातही चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. राज्यातील सर्वच प्रकल्पबाधितांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांना लाभ होईल: CM फडणवीसपुरंदर विमानतळ: पुणे आणि परिसराच्या विकासाचा रोडमॅप
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 23, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पुरंदर विमानतळासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित 7 गावातील ग्रामस्थांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद… pic.twitter.com/GwnLk8cR0j
राज्य शासनाने 2014 नंतर राबवलेल्या प्रकल्पांमधून विकास आणि नागरिकांचे हित साधले गेले आहे, त्या भागातील शेतकरी, नागरिक समाधानी झाल्याचे दिसून आले आहे. एका विमानतळामुळे परिसरातील शेती, उद्योग, व्यापार यामध्ये मोठ्या संधी उपलब्ध होतात, हे नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे दिसून आले आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळ झाल्यानंतर नक्कीच या भागातील शेतकऱ्यांना लाभ होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world