लोकसभेतील 'सांगली पॅटर्न' विधानसभा निवडणुकीत नको, अशी भूमिका काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत नेत्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी काँग्रेस आमदारांचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधातही नाराजीची सूर होता. संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर 11 जुलै रोजी चर्चा झाली होती. याचा आढावा आजच्या काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते.
(नक्की वाचा- Exclusive - काँग्रेसच्या 5 आमदारांवर कारवाई निश्चित, मात्र दोन आमदारांवर मेहरबानी ?)
सांगली पॅटर्न
लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने आघाडी धर्म न पाळता परस्पर सांगलीच्या जागेवर आपला उमेदवार घोषित केला होता. ठाकरे गटाची तिथे राजकीय ताकद नसताना आणि काँग्रेस पारंपरिक जागा असताना देखील दबावामुळे तिथे मागे हटावं लागलं होते. मात्र निकालानंतर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील तिथे विजयी झाले. त्यामुळेच सांगली पॅटर्न पुन्हा नको, असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला आहे.
प्रभाव असलेल्या जागा सोडायच्या नाहीत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगलीत आडमुठेपणाची भूमिका घेतली होती, त्याची पुनरावृत्ती नको अशा सूचना दिल्ली काँग्रेस नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत. विधानसभा जागा वाटपावेळी किमान काँग्रेस पक्ष जिथे प्रभावी आहे, त्या जागा सोडण्याची तयारी बिलकुल ठेवायची नाही, असं दिल्लीतील नेत्यांनी ठासून सांगितलं आहे.
(नक्की वाचा- वसंत मोरेंना कुणी दिली जीवे मारण्याची धमकी?, ऑडिओ क्लिप व्हायरल)
काँग्रेस 120-130 जागा लढवण्याची शक्यता
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस विधानसभेच्या 120-130 जागा लढवण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना (UBT) 90-100 जागा तर राष्ट्रवादी-सपा 75-80 जागा लढवण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 13 लोकसभा खासदारांसह काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. शिवसेना ठाकरे गट 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 8 खासदार निवडून आले आहेत.