अमजद खान, कल्याण
डोंबिवलीतील कोपर परिसरात भूमाफियांच्या हैदोस सुरू आहे. आपल्या जागेवर होत असलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार केली म्हणून तक्रारदाराचा घरावर भूमाफियांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलीस तपास सुरू आहे, मात्र भूमाफियांना शिवसेना शिंदे गटाच्या एका माजी नगरसेवक पाठीशी घालत असल्याने पोलीस आणि महापालिका अधिकारी राजकीय दबावात काम करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी पीडितांनी केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहे. या प्रकरणी सुधाकर पावशे यांनी म्हटलं की, माझ्या जागेवर अनधिकृत बांधकाम होत आहे, त्याची मी तक्रार केली. महापालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. भूमाफिया माझ्या घरावर हल्ला करतात. शिवसेना शिंदे गटाच्या एका माजी नगरसेवकाच्या सांगण्यावरुन हे सगळे सुरु आहे. सरकारने या घटनेकडे लक्ष द्यावे. मुख्यमंत्र्यानी या घटनेची गंभीर दखल घ्यावी. आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आज आम्ही घराबाहेर पडून शकत नाही. पोलीस देखील ज्या प्रकारे या प्रकरणात दखल घेतली पाहिजे, तशी घेत नाहीत.
(नक्की वाचा -पुण्यातील 42 बांगलादेशी नागरिकांचे पासपोर्ट रद्द, 'त्या' एजंटने कसा काढून दिला भारतीय पासपोर्ट?)
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहे. भूमाफियांना राजकीय संरक्षण असल्याने पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत आहेत. एखादा व्यक्ती अनधिकृत बांधकामांची तक्रार करतो, तर त्याच्या घरावर हल्ला केला जातो. असाच एक प्रकार डोंबिवली पश्चिम येथील कोपर परिसरात समोर आलाय .
डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात सुधाकर पावशे आपल्या कुटुंबासोबत राहतात. काही महिन्यापूर्वी त्यांच्या जागेवर एकाने इमारतीचे काम सुरु केलं. सुधाकर पावशे यांनी याबाबत महापालिकेत तक्रार केली. महापालिकेने कारवाई करण्याचं आश्वासन दिलं मात्र कारवाई केली नाही. वारंवार पाठपुरावा करुन देखील महापालिकेने कारवाई केली नाही.
(नक्की वाचा- हॉटेल पॉलिटिक्सचा जोर; भाजप, शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांचा मुंबईतील कोणत्या 5 स्टारमध्ये मुक्काम?)
सुधाकर पावशे यांच्या तक्रारीची दखल लोकायुक्तांनी घेतली. लोकायुक्तांनी ही अनधिकृत इमारत पाडण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी निवडणुकीचे कारण देत कारवाई टाळली. पावशे यांनी पाठपुरावा केल्यावर केडीएमसीने मंगळवारी सकाळी कोपरमधील या अनधिकृत इमारतीवर कारवाई केली. ती कारवाई देखील किरकोळ होती. त्यानंतर सुधाकर पावशे यांच्या घरासमोर काही महिलांनी पावशे यांना घराबाहेर येत दमदाटी सुरु केली. सुधाकर पावशे घराबाहेर आले नाहीत. या महिलांनी घराच्या बाहेरच्या वस्तूंची तोडफोड केली. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या महिलांच्या विरोधात विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world