
अमजद खान, कल्याण
गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक असताना डोंबिवलीत एका धक्कादायक घटनेमुळे गणेश भक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. शहरातील महात्मा फुले रोडवरील 'आनंदी कला केंद्र' या मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यातील मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे हा अचानक पळून गेला आहे. क्षमतेपेक्षा जास्त ऑर्डर घेतल्याने वेळेवर काम पूर्ण करणे शक्य नसल्याच्या भीतीने तो पसार झाल्याचे समोर आले आहे. यामुळे, मूर्ती बुक केलेल्या शेकडो गणेशभक्तांना मोठा धक्का बसला आहे.
बाप्पाला घरी कसे आणायचे?
मंगळवारी सकाळी जेव्हा ही बातमी पसरली, तेव्हा गणेशभक्तांनी महात्मा फुले रोडवरील चिनार मैदानाजवळ असलेल्या कारखान्यात मोठी गर्दी केली. ज्यांना जशी मिळाली, तशी मूर्ती घेऊन काही लोक घरी गेले, तर इतरांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला असून, ते मूर्तिकार प्रफुल्ल तांबडेचा शोध घेत आहेत.
(नक्की वाचा - Pune Manache Ganpati : पुण्यातील 5 मानाच्या गणपतींची मिरवणूक अन् पाणप्रतिष्ठापनेची वेळ ठरली, पाहा यादी!)
स्थानिक नागरिक आणि गणेशभक्तांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पोलिसांना लवकरात लवकर मूर्तिकाराचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका गणेशभक्ताने सांगितले की, "दीड महिन्यांपूर्वीच आम्ही मूर्ती बुक केली होती आणि त्याचे पैसेही दिले होते. आता ऐनवेळी घरी गणपतीची स्थापना कशी करायची, असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री प्रफुल्ल तांबडे कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ बसून रडत होता आणि "इतक्या ऑर्डर घेतल्या, काम पूर्ण झाले नाही, आता मी काय करू?" असे तो काही लोकांना सांगत होता. यामुळे घाबरून तो पळून गेला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
(नक्की वाचा- Pune Traffic Routes Changes : गणेश चतुर्थीनिमित्त पुण्यात वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?)
जादूगार अभिजीत यांनीही येथे मूर्ती बुक केली हेाती. त्यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्वतः या प्रकरणी तक्रार दाखल करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. या मूर्तिकाराकडे सार्वजनिक मंडळांच्याही मूर्तींचे काम होते, ज्या पूर्ण न झाल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. ही एक गंभीर घटना असून, पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world