धारावी पुनर्विकास प्रकल्प हा फक्त धारावीचाच नाही तर संपूर्ण मुंबईचा चेहरा मोहरा बदलणारा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. दुर्दैवाने या प्रकल्पावरून राजकारण सुरू झाले असून हे राजकारण स्वार्थासाठी सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. धारावीचा कायापलट होणार अशा चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर धारावीच्या पुनर्विकासाचे स्वप्न पूर्ण होईल अशी आशा धारावीकरांच्या मनात निर्माण झाली आहे. या आशेला कोणत्याही प्रकारचे ग्रहण लागू नये अशी धारावीकरांची मनोमन इच्छा आहे.
मजुरीचे काम करणारे व्यंकटेश येअरपुला हे जन्मापासूनच धारावीत राहातात. तीन मुले आणि पत्नीसह ते एका माणसालाही धड पुरणार नाही इतक्या खोलीत राहतात. त्यांचे उभे आयुष्य लहानशी खोली, घाणीचे साम्राज्य आणि किमान सोई-सुविधा मिळवण्यासाठी झगडण्यात गेले. व्यंकटेश यांचे घर आता जीर्ण झाले आहे. जे जगणं आपल्या वाटेला आले तेच आपल्या मुलांच्याही आयुष्यात येत असल्याची खंत त्यांना आहे. मुलं मोठी झाली असून भविष्यात त्यांचा संसार कसा वसवायचा ही चिंता देखील आहे. कारण घर हे खूप लहान असून ते सगळ्यांना पुरणारे अजिबात नाहीये. माझं दु:ख मी कोणाला सांगू असा आर्त सवाल व्यंकटेश विचारतात.व्यंकटेश हे 40 वर्षांचे आहेत. या 40 वर्षांत धारावीत आणि त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडला नसल्याचं ते सांगतात. मी जो त्रास भोगला तो माझ्या मुलांनी का भोगावा? असा प्रश्न ते विचारतात. धारावीचा पुनर्विकास होणार हे कळाल्यानंतर त्यांना आनंद झाला होता. आता कोणत्याही परिस्थितीत धारावीचा विकास होऊन आमच्यासह इथल्या सगळ्यांचा विकास झालाच पाहिजे असं त्यांनी म्हटलंय.
धारावीने अनेकांना जगवलं, पोटापाण्याला लावलं. मात्र जगणं हे दिवसेंदिवस किड्यामुंग्यांपेक्षा वाईट होत गेलं. चप्पल दुरुस्ती आणि विक्रीचे काम करणाऱ्या सतीश गायकवाड यांचा मोठा मुलगा 5 वर्षांचा आहे तर मुलगी 2 वर्षांची आहे. सतीश गायकवाड यांना आणखी एक मूल होतं मात्र ते दुर्गंधीमुळे आजारी पडून दगावलं. धारावीमध्ये भयंकर अस्वच्छता असलेल्या गटारातून पिण्याच्या पाईपलाईन जातात. दूषित पाणी आणि इथल्या घाणीमुळे त्यांची मुले सतत आजारी पडत असतात. मुलांच्या उपचारावर मिळकतीतील बराच भाग खर्च होतो. हे असं किती दिवस जगणार ? आम्हाला मोकळा, स्वच्छ श्वास घेता येणार आहे की नाही ? असा प्रश्न त्यांच्या मनात सतत घोळत असतो. ही जीवघेणी घाण, अस्वच्छता यातून आम्ही मुक्त होऊ असा आशेचा किरण त्यांच्या मनात पुनर्विकास प्रकल्पामुळे निर्माण झाला आहे.
सुमन पोळ यांचं लग्न झालं आणि त्या धारावीत राहायला आल्या. साठी ओलांडलेल्या सुमन यांच्या पतीचे निधन झाले असून बारीकसारीक गोष्टी विकून त्या आपला उदरनिर्वाह करतात. सुमन यांच्या घरात आम्ही गेलो तेव्हा आम्हाला धक्काच बसला. वीतभर खोलीत त्यांचा पलंग होता आणि त्याच्या शेजारी एक मोरी होती. पलंगासमोर असलेल्या कपाटामुळे एक माणूस कसाबसा जाईल इतकीच जागा शिल्लक होती. पलंग आणि मोरीच्या मध्ये स्वयंपाकासाठीची जागा होती. बस्स इतकंच त्यांचं घर.सुमन ज्या घरात राहतात ते घर गळकं झालं आहे, पाणी पडून घरातील गोष्टी खराब होऊ नये म्हणून सगळ्यावर प्लॅस्टीक अंथरलेलं होतं. या घराच्या छताला इतकी ठिगळं लावली आहेत की त्यांची मोजदादही करता येत नाही. पावसाच्या पाण्यामुळे त्यांच घर जीर्ण झालं असून कधीही पडू शकतं. 27 वर्षांपूर्वी सुमन यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना मूलबाळ नसल्याने उतारवयात त्यांना कोणाचाही आधार नाही. घर दुरुस्त करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही.घरात साचणारं पाणी उपसण्यात त्यांचा अर्धा दिवस जातो. दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि घरी आल्यावर पाणी उपसण्याचं काम करायचं असं आयुष्य त्यांना कंठावं लागतंय. थंड फिरशी, पाऊल बुडेल इतकं घरात साचणारं पाणी यामुळे सुमन यांच्या पायाला संसर्ग झाला आहे. इथला विकास झाला तर आपल्याला पक्कं घर मिळेल अशी त्यांना आशा आहे.
व्यंकटेश येअरपुला, सतीश गायकवाड आणि सुमन पोळ ही काही उदाहरणं आहेत. त्यांच्यासारख्या व्यथा असलेली आणि दयनीय अवस्थेत जगणारी, कदाचित त्यांच्याही पेक्षा अधिक वाईट स्थितीत जगत असलेली धारावीत असंख्य माणसे आहेत. या माणसांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. या माणसांनाही स्वच्छ सुंदर घरात राहण्याचा अधिकार आहे, या माणसांनाही सोई-सुविधा मिळण्याचा अधिकार आहे. राजकारणाचा वरवंटा आपले उज्ज्वल भविष्य चिरडणारा नसाना इतकी माफक अपेक्षा ही सगळी लोकं करत आहेत.