
पुनर्विकासानंतर उपलब्ध होणाऱ्या दर्जेदार पायाभूत सुविधांमुळे धारावीचा चेहरामोहरा बदलेल आणि इतर उद्योगांप्रमाणे स्थानिक सुवर्ण उद्योगाला देखील नवी 'झळाळी' येईल, असा विश्वास धारावीतील सुवर्णकारांनी व्यक्त केला आहे. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळापासून धारावीत अस्तित्वात असलेल्या या सुवर्ण उद्योगाला पुनर्विकासात सामावून घेताना व्यावसायिकांच्या सूचनांचा सकारात्मक विचार व्हावा, अशी अपेक्षाही स्थानिक सुवर्णकारांनी व्यक्त केली आहे.
धारावीतील सुवर्ण उद्योगाला मोठी परंपरा
वास्तविक, धारावीतील चर्मोद्योग, वस्त्रोद्योग या उद्योगांप्रमाणेच इथल्या सुवर्ण उद्योगालाही मोठी परंपरा आहे.स्थानिक सुवर्णकारांनी दिलेल्या माहितीनुसार, आजमितीला धारावीमध्ये सोने आणि चांदीची विक्री करणारी सुमारे 150 ते 170 लहान-मोठी दुकाने आहेत. याशिवाय, प्रत्यक्ष दागिने घडविणारे सुमारे 50 कारखाने इथे आहेत.धारावीतील सर्व सोने विक्रीची दुकाने आणि कारखाने यांची एकत्रित वार्षिक व्यावसायिक उलाढाल सुमारे 150 ते 200 कोटी रुपयांपर्यंत असून यातून सुमारे 6000 ते 7000 प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाले आहेत. "कोट्यावधींची उलाढाल असूनही अपुऱ्या पायाभूत सुविधा, मोक्याच्या जागेचा अभाव, दाटीवाटीची वस्ती, बहुतांशी व्यावसायिकांची भाडेतत्वावरील दुकाने, धारावी बाहेरील ग्राहकांची कमतरता, अपुरी सुरक्षाव्यवस्था अशा विविध कारणांमुळे इथल्या सुवर्ण उद्योगाला मर्यादा आहेत" अशी प्रतिक्रिया 90 फिट रोडवरील 'सुपर ज्वेलर्स'चे मालक 40 वर्षीय प्रवीण जैन यांनी दिली.
मोठमोठ्या ब्रँडसचे दागिने धारावीत घडतात
पिढीजात सुवर्ण उद्योगात कार्यरत असलेल्या प्रवीण यांच्या मते, पुनर्विकासाने स्थानिक सुवर्ण उद्योगासाठी नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. "अनेक वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास व्हायलाच हवा.मात्र, पुनर्विकासात इथल्या सुवर्णकारांचे हित जपायला हवे. भविष्यात झवेरी बाजारासारखे 'ज्वेलरी हब' म्हणून धारावीला विकसित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा" अशा शब्दांत त्यांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, ज्वेलरी क्षेत्रातील मोठमोठे ब्रँड्स देखील धारावीतील कारखान्यांमधून दागिने 'घडवून' घेतात. स्थानिक व्यावसायिकांच्या मते, धारावीत तयार दागिन्यांपेक्षा दागिने घडवून घेण्याकडे स्थानिकांचा कल अधिक आहे. धारावीकर सोन्याकडे केवळ दागिना म्हणून न पाहता संकटकाळात तातडीने रोख रक्कम उपलब्ध करून देण्याचे साधन म्हणूनही पाहतात. त्यामुळे इथे ज्वेलरी दुकानांसह सोने तारण ठेवणाऱ्या मोठमोठ्या फायनान्स कंपन्या देखील दिसून येतात.
धारावीचा पुनर्विकास हवाच
काळा किल्ला परिसरात गेल्या 50 वर्षांपासून वडिलोपार्जित व्यवसाय करणारे भावेश जैन हे 'धारावी ज्वेलर्स असोसिएशन, चे समिती सदस्य आहेत. त्यांच्या मते, धारावीतील प्रत्येक व्यवसाय हा परस्परांवर अवलंबून असून इथली अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वसमावेशक पुनर्विकास हवा.
"आमचा स्थानिक ग्राहकवर्ग हा मुख्यतः मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्गीय आहे. आम्हाला पुनर्विकास तर हवाच. पण तो करताना आमचे इथले ग्राहकही इथेच राहिले, तरच आमचा व्यवसाय अबाधित राहील" अशी प्रतिक्रिया भावेश यांनी दिली.
नक्की वाचा: डीआरपीने सुरु केली पर्यावरण मंजुरी प्रक्रिया, धारावी प्रकल्पांतर्गत अक्सा-मालवणीतील जमिनीसाठी टीओआर दाखल
"पुनर्विकसित धारावीतील इमारतींमध्ये 10% जागा स्थानिक व्यावसायिकांसाठी राखीव ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतो. मात्र, धारावीचा कायापालट झाल्यावर इथे येणाऱ्या मोठमोठ्या ज्वेलरी ब्रँड्ससोबत आम्हाला स्पर्धा करावी लागेल. अशा वेळी स्थानिक व्यावसायिकांना संरक्षण देण्यासाठी शासनाने धोरण ठरवायला हवे. " अशी अपेक्षाही भावेश यांनी व्यक्त केली. "पुनर्विकासाला आमचे समर्थन आहे. मात्र आम्हाला नेमक्या कोणत्या भागात व्यावसायिक गाळे उपलब्ध होतील, याबाबत आणखी स्पष्टता यायला हवी" अशी प्रतिक्रिया धारावी ज्वेलर्स असोसिएशनचे सदस्य असलेल्या 60 वर्षीय नरेश कुमार पालरेचा यांनी दिली. वास्तविक, धारावीतील 40% ते 50% सुवर्णकार हे भाडेतत्वावरील गळ्यातून आपला व्यवसाय चालवत आहेत. पुनर्विकासातील तरतुदीमुळे, या व्यवसायिकांना अद्ययावत सोई-सुविधांनीयुक्त व्यावसायिक गाळे धारावीतच उपलब्ध होतील. शिवाय मोठ्या प्रमाणात नवा ग्राहक वर्गही जोडला जाईल.
सोन्याची धारावी
स्थानिक व्यावसायिकांच्या मते, सन 1940 मध्ये रावतमल वारघी यांनी धारावी मेन रोड येथे पोस्ट ऑफिसजवळ आर व्ही ज्वेलर्स नावाने पहिले दुकान सुरू केले. कालांतराने, त्यांची मुले, नातेवाईक आणि त्यांच्याकडे काम करणारे कामगार यांनी धारावीत आणि मुंबईतील अन्य ठिकाणी ज्वेलरी दुकाने सुरू केली. या एका दुकानापासून संपूर्ण मुंबईत सुरू झालेली सुमारे 800 ज्वेलरी दुकाने आज कार्यरत आहेत.
नक्की वाचा: धारावी ते बॉलिवूड, जमील शाह! ज्याने तयार केलेल्या बुटांवर थिरकते बॉलिवूड
धनत्रयोदशीला सोने खरेदीत वाढ
अलीकडे सोन्याच्या दराने उच्चांकी दर गाठल्याने सोने खरेदी मंदावली आहे. दर आणखी वाढणार की नाही, याबाबत संभ्रम असल्याने ग्राहकांकडून सोन्याची विक्री देखील कमी झाली आहे. यामुळे सध्या जेमतेम व्यवसाय सुरू आहे. मात्र, दिवाळीत धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीत 20% ते 30% टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याची माहिती धारावीतील सुवर्णकारांनी दिली.