डोंबिवलीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पक्षाच्या चार माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या इनकमिंगमुळे डोंबिवलीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे फेरबदल होण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या नेत्यांनी हातावर बांधले शिवबंधन
या पक्षप्रवेश सोहळ्यात डोंबिवलीतील अनेक मातब्बर नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यापूर्वी केडीएमसी निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांनी मनसेच्या (MNS) तिकिटावर, तर श्रीकर चौधरी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आपले राजकीय नशीब आजमावले होते. आता या सर्व प्रमुख चेहऱ्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे डोंबिवलीत शिवसेनेची संघटनात्मक ताकद प्रचंड वाढणार आहे.
(नक्की वाचा- Jeans Small Pocket: जीन्सला उजव्या बाजूला 'तो' छोटा खिसा का असतो? जाणून घ्या रंजक माहिती)
ठाकरे गटालाही धक्का
शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख योगेंद्र भोईर यांनीही पक्ष बदलत शिंदे गटाची वाट धरली आहे. याशिवाय केडीएमसीच्या निवृत्त सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले.
14 वर्षांच्या संघर्षानंतर पिंपळेश्वर मंदिराला जागा मंजूर
हा पक्षप्रवेश सोहळा पिंपळेश्वर मंदिरातच घेण्यामागे एक मोठे कारण होते. नुकतेच राज्य सरकारने पिंपळेश्वर महादेव मंदिरभूमीसाठी 4 एकर 25 गुंठे जागा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 14 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर हा प्रलंबित निर्णय मार्गी लागल्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतः पिंपळेश्वर मंदिरात जाऊन भगवान शंकराचा जलाभिषेक केला आणि दर्शन घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.
(नक्की वाचा- Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक)
विधान परिषदेच्या 2 जागा बिनविरोध होण्याचे संकेत
पक्षप्रवेश सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीबाबत सूचक वक्तव्य केले. शिवसेना पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या दोन जागा बिनविरोध होण्याबाबत त्यांनी सकारात्मक संकेत दिले. सरकारवर सर्वांचा विश्वास असल्याने याबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो,असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world