
अमजद खान
काँग्रेसचे पदाधिकारी प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही गोष्ट त्यांना महागात पडली आहे. या कारणावरुन संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी पगारे यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना भर रस्त्यात साडी नेसविली. या घटनेनंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. या घटनेवरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे. ही घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. शिवाय ज्या काँग्रेस नेत्याला साडी नेसवण्यात आली ते वयोवृद्ध आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे.
प्रकाश पगारे हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. शिवाय ते ज्येष्ठ नागरीक आहे. त्यांनी पंतप्रधानांच्या विरोधात एक पोस्ट सोशल मिडियावर टाकली होती. या पोस्टने भाजपने जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि संदीप माळी हे संतप्त झाले. त्यांनी पगारे यांना फोन करुन बोलालून घेतले. त्यानंतर पगारे यांना डोंबिवलीत भर रस्त्यावर साडी नेसवण्यात आली. साडी नेसवतानाचा व्हिडीओ ही सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे. सध्या त्यांना साडी नेसवल्याचा व्हीडिओ आणि फोटो जोरदार व्हायरल होत आहे.
या बाबत पगारे यांनी सांगितले की, मला सुरेश पाटील या नावाने फोन आला होता. मात्र माझ्या फोनवर कोणाचा फोन आहे हे ओळता येतं. त्यानुसार तो फोन संदीप माळी याचा होता. त्याचं नाव ही आलं होतं. त्याला विचारले तू सुरेश पाटील नाव का सांगतो. त्यावर त्याने त्याच नावाने फोन रजिस्टर असल्याचे सांगितले. शिवाय एक मिटींग त्यासाठी या असं सांगण्यात आलं. पण आपण प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आपल्याला परत फोन करण्यात आला. त्यावेळी आपण डोळे तपासण्यासाठी रुग्णालयात निघालो होतो. त्यानंतर रुग्णालयाच्या बाहेरच नंदू परब आणि संदीप माळी हे त्यांच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. त्यांनी मी केलेली पोस्ट मला दाखवली.
नक्की वाचा - Kalyan News: कल्याणमध्ये नशेखोरांचा हैदोस! खात्री पटल्याशिवाय लोक उघडत नाहीत दार
त्यानंतर त्या सर्वांनी आपल्याला शिवीगाळ केली. जातीवाचक शब्द वापरले. शिवाय आपल्याला जबरदस्तीने साडी नेसवली. पण मी टाकलेल्या पोस्टशी आपण ठाम असल्याचं या सर्वांना ठणकावून सांगितल्याचं ते म्हणाले. तुम्हाला पोस्ट वाईट वाटत असेल तर माझ्या विरोधात गुन्हा दाखल करा असं आव्हान ही दिल्याचं पगारे म्हणाले. संदीप माळी याच्या विरोधात 22 गुन्हे दाखल आहेत. तो तडीपार आहे. तर नंदू परब डोंबिवलीतल्या बेकायदा इमारतीच्या घोटाळ्यात आहे असा आरोप ही त्यांनी केला. दरम्यान ज्या पोस्टवरून हा वाद झाला ही पोस्ट पगारे यांची नाही तर ती त्यांनी फॉर्वर्ड केल्याचे त्यांनी सांगितले. यावर कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले की, घटनेला प्रकार निंदनीय आणि निषेधार्थ आहे.
पगारे यांना खोटे बोलून साडी नेसवली. पगारे यांना धमकविले आहे. जातीवाचक शब्द वापरले आहेत. या प्रकरणी डीपीसीची भेट घेऊन परब आणि माळी यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणार आहोत असं सचिन पोटे म्हणाले. तर भाजप जिल्हाध्यक्ष परब यांनी सांगितले की पगारे यांनी पंतप्रधानांचा साडी नेसलेला फोटो व्हायरल केला होता. पंतप्रधानांचा अपमान केला होता. आम्ही हे काम कधी सहन करणार नाही. त्यांनी ज्या प्रकारे साडी नेसून फोटो व्हायरल केला, त्याच प्रकारे त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे. भाजप पदाधिकारी संदीप माळी यांनी सांगितले की, यापुढे आमच्या नेत्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली तर त्याचे उत्तर त्यांना लगेच मिळेल. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world