
अमजद खान, डोबिंवली
डोंबिवलीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या शाखेवर काही दिवसांपूर्वी दगडफेकीची घटना घडली होती. या प्रकरणानंतर डोबिंवलीतील मुस्लीम समाजाविरोधात हिंदू एकवटले आहेत. दगडफेकीच्या घटनेनंतर डोंबिवलीमध्ये निषेध सभा पार पडली. या सभेत अल्पसंख्यांकांच्या दुकानांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच या निषेध सभेमध्ये दर महिन्याला महाआरती करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांची काही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र एकीकडे औरंगजेबाच्या कबरीचा विषय चर्चेत असताना नव्या वादाला तोंड फुटले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निषेध सभेत एकूण चार मुद्दे मांडण्यात आले. मुस्लीमांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचं या सभेत ठरलं आहे. दुकानात गेल्यावर दुकानाच्या मालकाचे नाव विचारा. दुकानदाराने नाव न सांगितल्यास त्या दुकानाचा फोटो व्हॉटसअप ग्रुपवर टाका. त्यानंतर त्या दुकानाशी संपूर्ण व्यवहार बंद करा, असं आवाहन या सभेतीन करण्यात आलं.
(नक्की वाचा- "बरं झालं पक्ष फुटला…", सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल)
डोंबिवलीतील रिक्षा चालकांची माहिती देखील गोळा करण्याचे आवाहन येथे करण्यात आले. चालक आणि मालक वेगवेगळे असतात. चालक आणि मालक वेगवेगळे असले तरी त्या रिक्षात बसायचं नाही. चार-पाच किलोमीटर चालत जाईन पण, अल्पसंख्यांकांच्या रिक्षात बसणार नाही.
आपली घरे अल्पसंख्यांकांना भाड्याने देऊ नका असे आवाहन या सभेत करण्यात आलं. आपल्याला यापुढे धर्मांध व्हावे लागेल, धर्मांध हिंदू व्हावे लागेल. डोंबिवलीत दर महिन्याला एक महाआरती करण्याचा निर्णय या सभेतून जाहीर करण्यात आला. महाआरतीला सगळ्या डोंबिवलीकरांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
(नक्की वाचा- Pune Politics : पुण्यात काँग्रेसला खिंडार; रविंद्र धंगेकरानंतर जवळपास 100 पदाधिकारी पक्ष सोडणार)
गुढी पाडव्यापासून महाआरतीला सुरुवात होणार आहे. गुढी पाडव्याची महाआरती आप्पा दातार चौकात पार पडणार आहे. तर दुसरी आरती आठवड्याच्या तिसऱ्या शनिवारी कावेरी चौकात होणार आहे, अशी माहिती या सभेतून देण्यात आली.
काय आहे प्रकरण?
डोंबिवलीतील खंबळपाडा परिसरात रात्रीच्या वेळी सुरु असलेल्या आरएसएसच्या शाखेवर दगडफेक करण्यात आली. एका दगडफेकीच्या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही. मात्र दगडफेकीमुळे कल्याण डोबिवलीत वातावरण तणावपूर्ण झाले. डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. तपासानंतर चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले गेले. या मुलाना दगड मारण्याकरीता रिजवान सय्यद यांने प्रवृत्त केल्याचा आरोप केला गेला. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता कल्याण न्यायालयात आरएसएस आणि मुस्लिम तरुणांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी तक्रार नोंदविली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world