भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ‘एक बंधन, रक्षाबंधन' या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून डोंबिवलीतील तरुणांनी देशभक्तीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. रोहित आचरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डोंबिवली ते कारगिल असा 2252 किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करून आज डोंबिवलीत पुनरागमन केले.
रोहित आचरेकर यांच्या ‘वे टू कॉज रायडर्स क्लब'तर्फे गेली 20 वर्षे हा कौतुकास्पद उपक्रम राबवला जात असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार'च्या माध्यमातून या प्रवासाला सहकार्य करत आहेत.
कारगिल ते उमलिंग ला: देशप्रेमाचा अनोखा उपक्रम
यंदा ‘शिवराष्ट्र – राष्ट्र प्रथम, वीर सर्वोपरि' या संकल्पनेवर आधारित असलेल्या या प्रवासात रायडर्सनी अनेक विक्रम आणि देशभक्तीपर उपक्रम राबवले. 15 ऑगस्ट रोजी कारगिल येथे तब्बल 1000 स्क्वेअर फूटचा भव्य राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला, तर विजयपथावर 12 स्क्वेअर फूट आकाराचे 42 तिरंगे फडकवण्यात आले.
लेह, तुरतुक, पँगाँग लेक, हानले, लामायुरू आणि जगातील सर्वात उंच रस्ता असलेल्या उमलिंग ला येथे देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 80 स्क्वेअर फूट तिरंग्याचे हँड हॉस्टिंग करण्यात आले. 28 ऑगस्ट रोजी कारगिल येथे तैनात असलेल्या भारतीय सैनिकांच्या हातावर राख्या बांधून ‘एक बंधन, रक्षाबंधन'चा संदेश देण्यात आला.
दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन प्रवासाची सांगता
सीमेवर राष्ट्रध्वजाचा सन्मान वाढवून आणि जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करून परतलेल्या या सर्व रायडर्सचे डोंबिवलीत जंगी स्वागत करण्यात आले. डोंबिवलीचा मानबिंदू आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या मंचावर सहभागी होऊन या रायडर्सनी आपल्या 2252 किमीच्या प्रदीर्घ देशभक्तीपर प्रवासाची पूर्णता केली.
सीमेपासून शहरापर्यंत राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवणारा हा उपक्रम सर्व डोंबिवलीकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world