जाहिरात

Raj Thackeray : राज ठाकरेंशी बोलून घ्या! मनसेच्या माजी आमदाराची X पोस्ट चर्चेत

Raj Thackeray : राज ठाकरेंशी बोलून घ्या! मनसेच्या माजी आमदाराची X पोस्ट चर्चेत
मुंबई:

वरळीहून शिवडीला अवघ्या काही मिनिटांमध्ये पोहोचता यावे यासाठी एक नवा पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल डबल डेकर असणार असून या पुलासाठी ब्रिटीशकालीन एलफिन्स्टन पूल पाडण्यात येणार आहे. या पुलाच्या पाडकामाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या पुलाच्या पाडकामापूर्वी प्रभादेवी पूल परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे नीट पुनर्सवन केले जावे अशी मागणी करण्यात येत आहे. याशिवाय प्रभादेवी आणि परळमध्ये पादचाऱ्यांना जाणे-येणे सोपे व्हावे यासाठी पादचारी पुलाचे काम आधी करावे अशी मागणीही करण्यात आली आहे. या दोन मागण्या पूर्ण होईपर्यंत पुलाचे काम होऊ देणार नाही असे स्थानिकांनी म्हटले आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे पाडकामासाठी पूल बंद करण्याचे नियोजन फसले होते. 

या पुलाच्या परिसरातील नागरिकांनी 2 एप्रिल रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी X पोस्टद्वारे म्हटलं आहे की "जे तुमची घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या!!

मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाजवळील रहिवाश्यांना घरे खाली करण्य‍ाची शासनाकडून नोटीस देण्यात आली मात्र घरांची पुढील परिक्रमा कशी असेल, स्थलांतरीत घरे देण्याची माहिती न देता नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार सुरु होताच स्थानिकांनी मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांना भेटुन व्यथा मांडली. राजसाहेबांनी या प्रकरणात नागरिकांना धीर देऊन "जो कोणी येईल त्याला सांगा राज ठाकरेंशी बोलणं झालंय. योग्य माहिती मिळाल्याशिवाय घरं खाली होणार नाहीत अशी तंबीही दिली."

पूल बंद करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या बदलांसंदर्भात हरकती व सूचना मागवल्या होत्या. या दोन वर्षांच्या बंदीमुळे परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. या पुनर्बांधणीच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

( नक्की वाचा : 'आमची जीभ पोळलीय, तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा?' संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना सवाल )
 

पुलाच्या नियोजित पाडकामासाठी यापूर्वी 13 एप्रिलपर्यंत सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यावेळी नागरिकांनी हरकती न घेतल्यास 15 एप्रिलपासून वाहतूक बंद करून पाडकाम सुरू करण्याचा विचार होता. दरम्यान, या उड्डाणपुलामुळे बाधित झालेल्या स्थानिक रहिवाशांनी आपले पुनर्वसन याच ठिकाणी करण्याची मागणी कायम ठेवली आहे. जोपर्यंत त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत पाडकाम सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे.

या पुलाच्या विरोधात असलेल्या नागरिकांच्या बाजूने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे उतरली असून यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेने इथल्या रहिवाशांसाठी सह्यांची मोहीम राबवली होती तर मनसेने धरणे आंदोलन केले होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: