
BMC ESR : मुंबई महानगरपालिकेकडून वार्षिक पर्यावरणीय अहवाल (Environmental Status Report- ESR) सादर करण्यात आला असून यामधून धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईतील 24 वॉर्डांपैकी 9 ठिकाणी गेल्या वर्षीच्या तुलनेत पिण्याच्या पाण्याचा दर्जा अधिक वाईट झाल्याचं समोर आलं आहे.
शुद्ध पिण्याचं पाणी चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. पावसाळ्यात तर अनेक ठिकाणी अशुद्ध पाण्यामुळे आजार पसरल्याच्या बातम्या दरवर्षी येत असतात. दरम्यान पालिकेच्या अहवालामुळे चिंता वाढली आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी, मुंबईत दररोज सुमारे 150 ते 180 पाण्याचे नमुने गोळा केले जातात. पावसाळ्यात किंवा आपत्कालीन परिस्थितीत, ही संख्या दररोज 250 नमुन्यांपर्यंत वाढू शकते.
बी वॉर्डमधील डोंगरी आणि उमरखाडीमध्ये अयोग्य पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यामध्ये सर्वाधिक 2.2 टक्के वाढ झाली आहे. त्याशिवाय जी दक्षिणमधील वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी, लोअर परेल येथे 0.5 वाढ झाली आहे, असं संजीव देवासिया यांनी सांगितलं. 2024-25 च्या ईएसआरमध्ये सादर केलेल्या चाचणी निकालांनुसार, मुंबईतील अनेक भागात जल प्रदूषणात किरकोळ सुधारणा झाली आहे. उदाहरणार्थ, एच/पूर्व वॉर्डमध्ये (ज्यामध्ये सांताक्रूझ, खार आणि वांद्रे पूर्व समाविष्ट आहे) 1.6% अयोग्य पाण्याचे नमुने नोंदवले गेले, जे गेल्या वर्षीच्या 1.7% पेक्षा किरकोळ सुधारणा आहे.
सकारात्मक बाब म्हणजे गेल्या तीन वर्षात पहिल्यांदा पालिका सहा वॉर्डमध्ये अयोग्य पाण्याचं प्रमाण शून्यावर आणण्यात यशस्वी ठरली आहे. याउलट गेल्या वर्षी केवळ एकाच वॉर्डमध्ये हे शक्य झालं होतं. त्यापूर्वी 2022-23 मध्ये तर एकाही वॉर्डात हे शक्य झालं नव्हतं. सी वॉर्ड (काळबादेवी), एन वॉर्ड (घाटकोपर, विद्याविहार) आणि पी नॉर्थ वॉर्ड (मालवणी, मढ, मालाड) सारख्या काही भागात दूषित पाण्याच्या नमुन्यांचे प्रमाण शून्य असल्याचे आढळून आले.
पिण्याच्या पाण्याचा दर्जा वाईट असलेले वॉर्ड
1 बी वॉर्ड - डोंगरी आणि उमरखाडी
2 जी दक्षिण - वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी, लोअर परेल
3 एच/पूर्व वॉर्ड - सांताक्रूझ, खार आणि वांद्रे
4 ए वॉर्ड - कुलाबा, कफ परेड आणि नरिमन पॉइंट
5 टी वॉर्ड - मुलुंड
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world