राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची दुसरी यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र शरद पवार गटाने यादी जाहीर करताच महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचं अधोरेखित झालं आहे. कारण आधीच शिवसेनेने जाहीर केलेल्या जागेवर शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली आहे.
नक्की वाचा: राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तिसऱ्या यादीची वैशिष्टे
- मराठा विरुद्ध ओबीसी : शरद पवार गटाने येवला मतदारसघांत छगन भुजबळ यांच्याविरोधात मराठा चेहरा दिली आहे. येवला मतदारसंघात शरद पवार गटाने माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. माणिकराव शिंदे हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे येथे मराठा विरुद्ध ओबीसी सामना होताना दिसेल.
- पिता-पुत्र संघर्ष टळला : दिंडोरी मतदारसंघातून अखेर गोकुळ नरहरी झिरवाळ यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात पिता-पुत्रांचा संघर्ष लढत टळली आहे. नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात सुनिता चारोस्कर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरी मतदारसंघात आता दोन राष्ट्रवादींचा सामना रंगणार आहे.
- गिरीज महाजनांचे निकटवर्तीय शरद पवार गटातून रिंगणात : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून भाजपमधून आलेल्या गणेश गीते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. महायुतीकडून राहुल ढिकले यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज गणेश गिते यांची बंडखोरी केली आहे.
- पुण्यातून दोन उमेदवार : शरद पवार गटाकडून पुण्यातील दोन उमेदवारांची घोषणा दुसऱ्या यादीत करण्यात आली आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातून अश्विनी कदम तर खडकवासल्यातून सचिन दोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता : परांडा येथे ठाकरे गटाने रणजीत पाटील यांच्या नावाची आधीच घोषणा केली आहे. मात्र राष्ट्रवादीने याच ठिकाणी राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे.
- पिचड पिता-पुत्रांची निराशा : अकोले मतदारसंघातून माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे पुत्र आणि माजी आमदार वैभव पिचड यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळेल अशी आशा होती. मात्र शरद पवार गटाने अमित भांगरे यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे आता पिचड बंडखोरी करणार का याकडे लक्ष आहे.
- आयात उमेदवार : शरद पवार गटाने दुसऱ्या यादीत बाहेरुन आलेल्या उमेदवारांवर विश्वास दाखवला आहे. गंगापूरमधून सतीश चव्हाण (अजित पवार गट), माळशिरसमधून उत्तमराव जानकर (भाजप), नाशिक पूर्वमधून गणेश गीते (भाजप), फलटणमधून दीपक चव्हाण (अजित पवार गट) यांना शरद पवार गटाने संधी दिली आहे.
नक्की वाचा: राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world