जाहिरात

Palghar News : कुत्र्याने पायाचा लचका तोडला, 4 दिवसांच्या बाळाला उघड्यावर टाकलं; आईचं संतापजनक कृत्य उघड

डहाणू उपजिल्हा रुग्णालयात चार दिवसांच्या नवजात बालिकेच्या अंगावर गंभीर जखमा आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Palghar News :  कुत्र्याने पायाचा लचका तोडला, 4 दिवसांच्या बाळाला उघड्यावर टाकलं; आईचं संतापजनक कृत्य उघड

मनोज सातवी, प्रतिनिधी

Palghar News : डहाणू उपजिल्हा रुग्णालयात चार दिवसांच्या नवजात बालिकेच्या अंगावर गंभीर जखमा आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासणीत कुत्र्याच्या हल्ल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला असला तरी जखमांबाबत मातेने दिलेल्या विसंगत उत्तरांमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. बोईसर येथून उपचारासाठी आणलेल्या बालिकेच्या जखमा सुमारे एक दिवस जुन्या असल्याचे निष्पन्न झालं आहे. सुरुवातीला बाळ पडल्याचे सांगणाऱ्या मातेने नंतर वेगवेगळी कारणे दिल्याने संशय बळावला आहे. दरम्यान, बाळ उघड्यावर टाकल्याने कुत्रा किंवा मांजरीने हल्ला केला असावा, अशी चर्चा आहे.

याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलेला बाळ नको असल्यामुळे तिने बाळाला उघड्यावर टाकून दिले होते. मात्र परिसरातील लोकांनी यावर आक्षेप घेत तिला याबाबत जाब विचारला. त्यामुळे तिने बाळाला पुन्हा परत आणल्याचे बोलले जात आहे. परंतु, तोपर्यंत उघड्यावर असलेल्या या बालिकेवर कुत्र्याने अथवा मांजरीने हल्ला करून तिला जखमी केले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. बालिकेची प्रकृती गंभीर असल्याने तिला वलसाड (गुजरात) येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डहाणू आणि बोईसर पोलीस घटनेचा सखोल तपास करत असून नवजात बाळांबाबत वाढत्या अमानवी घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Buldhana News : झोपेतच पत्नीला संपवलं; 4 वर्षांच्या मुलाचीही सुटका नाही; स्वत:च्याच कुटुंबाचा भयंकर शेवट

नक्की वाचा - Buldhana News : झोपेतच पत्नीला संपवलं; 4 वर्षांच्या मुलाचीही सुटका नाही; स्वत:च्याच कुटुंबाचा भयंकर शेवट

पालघर जिल्ह्यात नवजात मुलांना उघड्यावर, उकिरड्यावर टाकून देण्याचा घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या आहेत. साधारण एक दीड महिन्यापूर्वी पालघर रेल्वे स्थानक येथे एका नवजात बाळाला सोडून पालकांनी पळ काढला होता. दुसऱ्या घटनेत वाणगाव नजीकच्या साखरे येथील आश्रमशाळेच्या बाजूला उकिरड्यावर एका नवजात अर्भक मृतावस्थेत दिसले होते. तसेच वसईत कळम समुद्रकिनाऱ्यावर आणि वसईच्या पश्चिमेला घास रोड परिसरात देखील नवजात बाळ झुडपात टाकून दिल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर डहाणू येथे रुग्णालयात कुत्र्याने हल्ला केलेमुळे गंभीर अवस्थेत असलेल्या नवजात मुलीसाठी हळहळ व्यक्त होत आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना वारंवार घडत असून अशा निर्दयी पालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com