Palghar News: तारापूर एमआयडीसी (MIDC) मधील 'डी-झोन' परिसरात असलेल्या भघेरिया केमिकल्स (पूर्वीचे झेनित केमिकल्स) या कंपनीत आज दुपारी भीषण वायू गळती झाल्याची घटना घडली. ओलियम वायूची गळती झाल्याने संपूर्ण परिसरात घबराट पसरली असून, सुमारे दीड किलोमीटर अंतरापर्यंत या वायूचा परिणाम जाणवत आहे. यामुळे अनेक कामगार आणि स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास तसेच डोळ्यांच्या जळजळीचा सामना करावा लागत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी २ च्या सुमारास भघेरिया केमिकल्समधील ओलियमचा साठा असलेल्या टँक किंवा यंत्रणेतून गळती सुरू झाली. हा वायू अत्यंत जहाल असून तो हवेच्या संपर्कात येताच त्याचे रूपांतर सल्फर डाय ऑक्साईड आणि इतर सल्फरस ऑक्साईड्समध्ये झाले. यामुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले.
वाऱ्याच्या दिशेमुळे व्याप्ती वाढली
ज्या वेळी गळती झाली, त्या वेळी वाऱ्याचा वेग पश्चिमेकडून पूर्वेकडे होता. परिणामी, हा विषारी वायू वाऱ्यासोबत वेगाने वाहत गेला. औद्योगिक वसाहतीतील इतर कंपन्यांमधील कामगार आणि जवळच असलेल्या रहिवासी वस्त्यांमधील नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. साधारण दीड ते दोन किमीच्या परीघात या वायूची तीव्रता जाणवत आहे.
(नक्की वाचा- Thane News: सेक्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्रीला अटक; ज्युनियर कलाकारांना आमिष दाखवून करत होती फसवणूक)
वायुगळतीचे परिणाम
- डोळ्यांची समस्या: डोळे लाल होणे आणि तीव्र आग होणे.
- घशाचा त्रास: घशात खवखव होणे, कोरड पडणे आणि श्वास घेताना अडथळा येणे.
- अनेकांना मळमळणे आणि छातीत जळजळ होण्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत.
गळती रोखण्याचे प्रयत्न सुरु
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गळती रोखण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील इतर कंपन्यांमधील काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
(नक्की वाचा- पुण्यात खळबळ! कोट्यवधींच्या 'डिजिटल अरेस्ट' स्कॅममध्ये प्रसिद्ध 'रील स्टार'चा हात; पोलिसांकडून शोध सुरू)
जिल्हाधिकाऱ्यांकडून खबरदारीचे आवाहन
परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, खिडक्या बंद ठेवाव्यात आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यास त्वरित ओला रुमाल नाका-तोंडाला लावून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
पाहा VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world