नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखेने सीबीडी बेलापूर येथील स्पा सेंटरवर छापा टाकून एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 7 महिलांची सुटका करण्यात आली असून मॅनेजर नितू प्रजापत हिला अटक करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईनंतर शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
शहराची "रेड झोन"कडे वाटचाल?
स्थानिक नागरिकांमध्ये सध्या अशी चर्चा आहे की, नवी मुंबईतील परिस्थिती हळूहळू "रेड झोन"कडे झुकत आहे. गेल्या 40 महिन्यांपासून अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. एकाच ठिकाणी दीर्घकाळ तैनात असल्यामुळे काही अधिकारी आणि अवैध धंदे चालवणारे यांचे साटेलोटे निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच शहरात बेकायदेशीर धंद्यांना खतपाणी मिळत असल्याचे बोलले जात आहे.
(नक्की वाचा- VIDEO: मिरा-भाईंदरमधील रस्त्यावर 'झॉम्बी'? मुंबईसह परिसरात घबराट; काय आहे प्रकरण?)
स्पा सेंटरच्या आडून 150 ठिकाणी अवैध धंदे?
शहरात अधिकृतपणे बार बंद असले, तरी 150 पेक्षा अधिक स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय फोफावल्याचा आरोप केला जात आहे. गुन्हे शाखेने केलेली कारवाई ही केवळ हिमनगाचे टोक असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये थायलंड आणि ईशान्य भारतातील महिलांचा समावेश असल्याने मानवी तस्करीचे जाळे आंतरराष्ट्रीय स्तरावर असण्याची भीती व्यक्त होत आहे.
केवळ "ॲक्शन मोड"ची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न?
वरिष्ठ पोलीस अधिकारी अवैध धंद्यांविरोधात कठोर असल्याचे भासवत असले तरी, अधूनमधून होणाऱ्या या कारवाया केवळ आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आहेत का, अशी टीका होत आहे. "आम्ही बेकायदेशीर धंद्यांना थारा देत नाही" हे दाखवण्यासाठी काही ठराविक ठिकाणी छापेमारी केली जाते, मात्र प्रत्यक्षात शहरातील गल्लीबोळातील वास्तव वेगळेच असल्याचा दावा नागरिक करत आहेत.
(नक्की वाचा- Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! हायकोर्ट वकिलाची बीड बायपासवर निर्घृण हत्या)
परदेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्याचा प्रश्न
या कारवाईमुळे बांगलादेशी आणि इतर परदेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. थायलंडमधील महिला स्पा सेंटरमध्ये आढळल्याने व्हिसा नियमांचे उल्लंघन आणि मानवी तस्करी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या गुन्हे शाखा या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world