
प्रांजल कुलकर्णी, नाशिक
अनाधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज सकाळपासूनच तणावाची स्थिती पाहायला मिळत आहे. नाशिकच्या द्वारका, काठे गल्ली परिसरात असलेल्या अनाधिकृत धार्मिक स्थळाविरोधात सकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने धार्मिक स्थळाजवळील अतिक्रमण हटवलं आहे. मात्र दर्गा हटवा अशी मागणी सकल हिंदू समाजाकडून होत असल्याने तणाव निर्माण झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी घटनास्थळी भेट देण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळापासून काही अंतरावर त्यांना पोलिसांनी अडवले. "नाशिकमध्ये अनाधिकृत दर्ग्याचे अतिक्रमण काढण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र ही संपूर्ण दर्गाच अतिक्रमित असून ती आज 4 वाजेपर्यंत महापालिकेने हटवावी, त्यांच्या दुर्लक्ष मुळेच हे सर्व वाढत आहे", असा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे.
सकल हिंदू समाज आक्रमक
सकल हिंदू समाजाच्या मागणीनंतर नाशिक महानगरपालिकेने अनाधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात केली. महापालिका प्रशासनाकडून हिंदू संघटनांच्या आंदोलनापूर्वीच अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात केली. पोलीस बंदोबस्तात महापालिकेने कारवाई केली. संपूर्ण परिसर पोलीस बंदोबस्ताने सिल करण्यात आला.
(नक्की वाचा- Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप)
भाजप अध्यात्मिक आघाडी, साधू महंत आणि हिंदू संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार होते. 'जेथे रस्त्यात दिसतील थडगे त्याच्या पुढे उभे राहतील बजरंग बलीची मंदिरे !' अशी हाक संघटनांच्या वतीने देण्यात आली होती. 25 वर्षांपासून पाठपुरावा करुनही हे अनधिकृत थडगे न काढल्याचा आरोप हिंदू संघटनानी करत आता आक्रमक पवित्रा घेतला होता.
विशेष म्हणजे हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी सकाळी महापालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित धार्मिक स्थळाच्या परिसरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगल नियंत्रण पथक, अतिरिक्त बंदोबस्त इतर जिल्ह्यातूनही मागवण्यात आला आहे. यासोबतच शहरातील इतर संवेदनशील ठिकाणी देखील पोलिसांकडून कडेकोट पहारा ठेवण्यात आला आहे.
(नक्की वाचा- कुणी निवृत्त PSI तर कुणी फाड-फाड इंग्रजी बोलतंय; शिर्डीत 80 भिकाऱ्यांची धरपकड)
अफवांवर विश्वास ठेऊ नये - मुस्लीम धर्मगुरूंचे आवाहन
नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू आहे. यामुळे नाशिक शहरात वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहे. मात्र मुस्लीम धर्मगुरू मौलाना इब्राहिम व शेहर ए खतीब यांच्यासह काही धर्मगुरूंनी स्वतः अतिक्रमणाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. दर्ग्यामधील भाग सुरक्षित असून बाहेरील भाग काढण्यात येत आहे. कोणतेही अनुचित घडले नसल्याचं सांगत त्यांनी शांततेचा आवाहन केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world