राहुल वाघ, प्रतिनिधी
Nashik SSC Paper Leak News : नाशिक जिल्ह्यामध्ये दहावीच्या परीक्षेदरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या घटनेत चक्क शिक्षकांनीच पुढाकार घेऊन गणिताचा पेपर सोडवल्याचे उघड झाले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथील परीक्षा केंद्रावर हा सर्व प्रकार घडला असून, यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.
परीक्षेचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 21 मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका मोबाईलवर बाहेर आली होती. त्यानंतर हे चक्र वेगाने फिरले आणि विद्यार्थ्यांच्या हातात थेट तयार उत्तरे पोहोचवण्यात आली.
पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिका मोबाईलवर
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील चिंचवड येथे जिल्हा परिषद आदर्श शाळा आणि एका खासगी आश्रमशाळेचे परीक्षा केंद्र आहे. दहावीच्या गणिताच्या पेपरच्या दिवशी, परीक्षा सुरू होऊन जेमतेम 21 मिनिटे झाली असताना प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून तो मोबाईलच्या माध्यमातून बाहेर पाठवण्यात आला.
ही प्रश्नपत्रिका बाहेर येताच जवळच्याच एका घरात काही शिक्षकांनी मिळून हा पेपर सोडवण्यास सुरुवात केली. शिक्षकांनीच पेपर सोडवून दिल्याने विद्यार्थ्यांचे काम सोपे झाले, मात्र यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
( नक्की वाचा : Amravati News : अमरावती झेडपीत काय चाललंय? मर्जीतील मुख्याध्यपकांसाठी CEO मॅडमकडून नियमांना केराची टोपली! )
परीक्षा केंद्रात 60 फोटोकॉपींचे वाटप
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकांनी पेपर सोडवल्यानंतर हरसूल येथून या उत्तरांच्या सुमारे 60 फोटोकॉपी तयार करून आणल्या गेल्या. विशेष म्हणजे, या फोटोकॉपी थेट परीक्षा केंद्राच्या आत नेऊन विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.
या संपूर्ण गैरप्रकारात केवळ बाहेरील व्यक्तीच नाही, तर परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख आणि काही शिक्षकांनी स्वतः सहभागी होऊन विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवल्याची चर्चा आहे. नियमांची पायमल्ली करत हा कॉपीचा प्रकार अगदी उघडपणे सुरू होता.
( नक्की वाचा : Badlapur News: होम लोन फेडलं तरी घर होणार सील? बदलापुरातील 'या' हायप्रोफाईल सोसायटीत खळबळ! )
भरारी पथक असतानाही कॉपीचा सुळसुळाट
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वेळी हा सर्व प्रकार सुरू होता, तेव्हा गटविकास अधिकाऱ्यांचे भरारी पथक त्या केंद्रावर तपासणीसाठी आले होते. भरारी पथक उपस्थित असतानाही केंद्रावर कॉपी पुरवण्याचे काम थांबले नाही. काही विद्यार्थ्यांचे नातेवाईक तर थेट परीक्षा हॉलमध्ये घुसले होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या बाकापर्यंत जाऊन त्यांना उत्तरे लिहून दिल्याचे चित्र तिथे पाहायला मिळाले. प्रशासनाचा कोणताही धाक उरला नसल्याचेच यावरून स्पष्ट होत आहे.
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आनंदी आनंद
राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे स्वतः नाशिक जिल्ह्याचे आहेत. त्यांच्याच जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्याच कार्यक्षेत्रात शिक्षकांनी अशा प्रकारे सामूहिक कॉपीला प्रोत्साहन दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बोर्डाच्या परीक्षेची गोपनीयता आणि सुरक्षितता वारंवार धोक्यात येत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आता या प्रकरणी दोषी केंद्रप्रमुख, शिक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रशासन काय कठोर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इथे पाहा Video
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world