जाहिरात

IndiGo Flight: पायलटच्या 'पॅन पॅन पॅन' मेसेजमुळे विमानतळावर धावपळ; इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबईत आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पायलटने "पॅन पॅन पॅन" असा तातडीचा संदेश दिला होता.

IndiGo Flight: पायलटच्या 'पॅन पॅन पॅन' मेसेजमुळे विमानतळावर धावपळ; इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

दिल्लीहून गोव्याला 191 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. बुधवारी रात्री 9.53 वाजता विमान सुरक्षितपणे मुंबई विमानतळावर उतरले. अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेवेळी वैमानिकांनी दिलेल्या 'मेडे मेडे' मेसेजची चर्चा होती. तर कालच्या इमर्जन्सी लँडिंगवेळी वैमानिकांना "पॅन पॅन पॅन" (PAN PAN PAN) असा मेसेज दिला. 

एअर इंडिया विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या गंभीर घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु वैमानिकाने योग्य वेळी दिलेल्या "पॅन पॅन पॅन" या तातडीच्या मेसेजमुळे आणि त्यांच्या कौशल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

(नक्की वाचा-  Legislative Council: विधानपरिषदेतील गणित बदललं, नवा विरोधी पक्षनेता कोण? काँग्रेस दावा करणार की...)

मिळालेल्या माहितीनुसार, एअरबस ए320 निओ विमानाने दिल्लीहून गोव्याकडे उड्डाण भरले होते. भुवनेश्वरपासून सुमारे 100 नॉटिकल मैल उत्तरेकडे असताना, विमानातील इंजिन क्रमांक 1 मध्ये अचानक बिघाड झाला. तांत्रिक बिघाडाचे गांभीर्य लक्षात घेता, पायलटने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) संपर्क साधून "पॅन पॅन पॅन" असा मेसेज दिला. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. 

"पॅन पॅन पॅन" हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरला जाणारा रेडिओ मेसेज आहे, जो 'मेडे' पेक्षा कमी गंभीर, परंतु तरीही तातडीची मदत आवश्यक असलेल्या परिस्थितीसाठी दिला जातो.  "पॅन पॅन पॅन" याचा अर्थ असा की विमानाला गंभीर समस्या आहे, परंतु ती जीवघेणी नाही आणि त्यामुळे तात्काळ धोक्याची शक्यता कमी आहे. मात्र विमानाला लवकरात लवकर आणि सुरक्षितपणे उतरवणे आवश्यक आहे.

(नक्की वाचा - Sangli News: सांगलीचा रँचो! 10 वीच्या विद्यार्थ्याचा देसी जुगाड, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना चाप बसणार)

मिळालेल्या माहितीनुसार, पायलटने रात्री सुमारे 9.32 वाजता मुंबईकडे विमान वळवण्याची विनंती केली आणि त्यानंतर अवघ्या 21 मिनिटांत, म्हणजेच रात्री 9.53 वाजता हे विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. आपत्कालीन परिस्थितीची पूर्वकल्पना असल्याने, मुंबई विमानतळावर तयारी करण्यात आली होती. विमानासाठी रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. 

इंडिगो एअरलाइनने या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, तांत्रिक बिघाडामुळे हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. आता हे विमान आवश्यक तपासणी आणि दुरुस्तीसाठी पाठवले जाईल. प्रवाशांना पुढील प्रवासासाठी इंडिगो एअरलाइनकडून पर्यायी विमानाची व्यवस्था केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com