जाहिरात

Big News: जन आरोग्य योजनेबाबत मोठा निर्णय, आता 5 लाखांहून अधिक खर्चाच्या 9 दुर्धर आजारांवर...

विस्तारीत योजनेमध्ये आरोग्य संरक्षणाची मर्यादा प्रति कुटुंब प्रति व्यक्ती पाच लाख रुपये इतकी आहे.

Big News: जन आरोग्य योजनेबाबत मोठा निर्णय, आता  5 लाखांहून अधिक खर्चाच्या 9 दुर्धर आजारांवर...
मुंबई:

विस्तारित महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांच्या दाव्यापोटी मिळणाऱ्या रक्कमेचा विनियोग केला जाणार आहे.  राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीसाठी तसेच शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी हा केला जाईल. तसेच गरजू रुग्णांसाठी 5 लाखांपेक्षा जास्त खर्च असणाऱ्या नऊ प्रकारच्या दुर्मिळ आजारांवरील खर्च राखीव निधीतून केला जाणार आहे. याबाबातच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.    

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत शासकीय रुग्णालयांना, आरोग्य संस्थांना राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून निधी दिला जातो. या निधीच्या वापराबाबत 11 जानेवारी 2019 मध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यात सोसायटीकडून मिळणाऱ्या निधीपैकी 20 टक्के रक्कम राखीव निधीसाठी जाणार आहे. तर उर्वरित 80 टक्के रक्कम संबंधित रुग्णालयांना दिली जाणार आहे. या 80 टक्के निधीतून रुग्णालयांना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 19 टक्के, रुग्णालयातील किरकोळ सामग्री व औषधांसाठी 40%, अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्त्यांसाठी 20 टक्के तर कार्यक्रम साहाय्य माहिती व प्रचार प्रसिद्धीसाठी 1 टक्के असा वापर करता येणार आहे.

नक्की वाचा - Public Health Scheme: महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेबाबत मोठी बातमी, सरकारने केला मोठा बदल

विस्तारीत योजनेमध्ये आरोग्य संरक्षणाची मर्यादा प्रति कुटुंब प्रति व्यक्ती पाच लाख रुपये इतकी आहे. मात्र या योजनेंतर्गत यकृत, अस्थिमज्जा, हृदय, फुफ्फुस इ. प्रत्यारोपणासारख्या 5 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च होणाऱ्या दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठी आरोग्य संरक्षण उपलब्ध नाही. त्यामुळे या आजारांसाठी उपचार घेणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. मात्र अशा नऊ आजारांसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे निर्माण होणाऱ्या राखीव निधीतून खर्च केला जाणार आहे. यामध्ये हृदय प्रत्यारोपणासाठी 15 लाख, फुफ्फुस प्रत्यारोपण 20 लाख, हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण 20 लाख, यकृत प्रत्यारोपण 22 लाख, अस्थिमज्जा प्रत्यारोपण (अलोजेनिक) 9.5 लाख, अस्थिमज्जा प्रत्यारोपण (अनरिलेटेड) 17 लाख, अस्थिमज्जा प्रत्यारोपण (हॅप्लो) 17 लाख, ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व इम्प्लांटेशन (TAVI) 10 लाख तर ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट (TMVR) 10 लाख रुपये असा खर्च प्रती रुग्ण करता येणार आहे.

नक्की वाचा - Kalyan News: 7 जणांकडून 5 महिने 1 अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अश्लील VIDEO व्हायरल

या योजनेतंर्गत उपचार प्रक्रियेत सहभागी  सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व नगर विकास विभागाच्या शासकीय आरोग्य संस्थांमधील डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या प्रोत्साहन भत्त्यात सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रोत्साहन भत्त्याबाबतच्या 11 जानेवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयातील भत्त्याच्या मर्यादेची अट शिथील करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनांतर्गत करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया, उपचार व त्यांच्या दरांमध्ये बदल करणे, मिळणाऱ्या शासकीय निधीचा तसेच राखीव निधीच्या विनियोगाबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष उपचार सहायता व सक्षमीकरण समितीचे गठन करण्यासही मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com