कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागला. या निवडणुकीत शिवसेना(एकनाथ शिंदे) पक्ष सगळ्यात मोठा पक्ष बनला असून त्यांचे 53 नगरसेवक निवडून आले आहेत. भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला असून त्यांचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. दोन्ही पक्ष महायुतीत लढले असल्याने हायुतीचा महापौर होईल हे निश्चित असतानाच मनसेनेही महायुतीला पाठिंबा दिला. या 'अनाकलयीन' घडामोडी नेमक्या कोणाला धक्का देण्यासाठी घडविण्यात येत आहेत याचा आपापल्या पद्धतीने अंदाज बांधण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत. काहींचा दावा आहे की भाजपचा महापौर कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोणत्याही स्थितीत बसू नये यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने खेळलेली ही खेळी आहे. काहींचा दावा आहे की ही खेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी धक्का आहे. या घडामोडींबद्दल बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते की,"काही लोक स्वार्थासाठी पक्ष सोडून जातात, अशा प्रवृत्तीबद्दल राज ठाकरेंनीही नाराजी व्यक्त केली आहे."
राज ठाकरेंना घडामोडींची माहिती होती
कल्याण डोंबिवलीतील घडामोडींबद्दल बोलत असताना शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार यांनी पत्रकारांना सांगितले की, "कल्याण-डोंबिवलीचा विषय राज ठाकरेंनी अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. राज ठाकरेंशी माझी चर्चा झाली आहे. 'काही मिळालं नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोकं असतात', असे राज ठाकरेंचे म्हणणे आहे." संजय राऊत यांच्या बोलण्यानुसार राज ठाकरे यांना हा निर्णय पटला नसल्याचे वाटू लागले होते, मात्र मनसेचे कल्याण-डोंबिवलीतील नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी कोकण भवनात माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितले होते की, "कल्याण-डोंबिवलीतील एकूण आकडेवारीबाबत मी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पूर्णपणे कल्पना दिली होती. जेव्हा आम्ही केडीएमसीतील संख्याबळ आणि स्थानिक परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली, तेव्हा त्यांनी आम्हाला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले."
संतोष धुरींची संजय राऊत यांच्यावर पुन्हा टीका
संजय राऊत यांनी केलेले विधान आणि राजू पाटील यांनी दिलेली माहिती यामध्ये मोठी विसंगती असल्याचे दिसून आले आहे. याबद्दल बोलताना पूर्वी मनसेत असलेले आणि आता भाजपमध्ये असलेल्या संतोष धुरी यांनी म्हटले की, "अशा तऱ्हेने पक्षांतर करणारे राजकीय मनोरुग्ण आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटल्याचे सांगणारे संजय राऊत स्वतः मनोरुग्ण आहेत. मनसेकडून कोणताही नेता किंवा प्रवक्ता यावर बोलत नाही आणि दोन्ही पक्षांचा प्रवक्ता आणि नेता असल्याप्रमाणे हा माणूस बोलतोय."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world