
अमजद खान
कल्याणच्या सापड गावातील एका स्मशानभूमीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दिसत आहे की एका दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात अंत्यविधी केला जात आहे. या स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही. स्वच्छतेसाठी पाणी नाही. हे कमी की काय त्या ठिकाणी लाईट ही नाही. दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात अंत्यविधी करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. विशेष म्हणजे हे गाव शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे गाव आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ तर उडालीच आहे पण आमदाराच्या गावची अशी स्थिती तर दुसऱ्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विश्वनाथ भोईर हे दोन वेळा शिवसेनेतर्फे निवडून आले आहेत. केडीएमसीकडे वारंवार पाठपुरावा करून देखील, ही दुरावस्था असल्याची बाब उघड झाली आहे. कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ग्रामस्थ या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी रात्रीच्या वेळेस स्मशानभूमीत घेऊन गेले. मात्र या स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. स्मशानभूमीत पोहचल्यावर त्याठिकाणी स्वच्छतेसाठी पाणी नाही. धक्कादायक म्हणजे त्याठीकाणी दिवाबत्तीची ही सोय नाही. नागरीकांनी दुचाकीच्या हेडलाईट आणि टॉर्चचा सहाय्याने अंत्यसंस्कार उरकला.
या स्मशानभूमीसाठी ऑगस्ट महिन्यात कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीचे पुढे काय झाले याचे उत्तर कोणाकडे नाही अशी चर्चा लोकांमध्ये आहे. त्यामुळे नागरीकांना अंधारात असलेल्या स्मशानभूमीत दुचाकीच्या हेडलाईन टॉर्च प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांचा हा परिसर आहे. आमदार भोईर हे उंबर्डे गावचे आहे. उंबर्डे गावाला लागूनच त्यांचे कुटुंबियांतील लोक सापर्डे गावात राहतात. आमदारांच्या गावाला लागून असलेल्या सापर्डे गावाची ही परिस्थिती आहे. तर शहरातील अन्य ठिकाणी काय अवस्था असेल याची कल्पना केलेलीच बरी अशी संतप्त प्रतिक्रिया अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरीकांनी व्यक्त केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world