जाहिरात

Kalyan News : तलाकसाठीच्या बैठकीत वाहिला रक्ताचा पाट; रुक्सारवर जीवघेणा हल्ला

कल्याणमधील वालधुनी परिसरात कौटुंबिक वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Kalyan News : तलाकसाठीच्या बैठकीत वाहिला रक्ताचा पाट; रुक्सारवर जीवघेणा हल्ला

Kalyan News : कल्याणमध्ये नात्यांचा थरकाप उडवणारा शेवट समोर आला आहे. तलाकच्या (घटस्फोट) वादातून संतप्त सासरकडून सून आणि तिच्या भावावर पोलीस ठाण्याबाहेरच जीवघेणा हल्ला करण्यात आला. चाकू आणि दगडाने झालेल्या या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मुख्य आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

तलाकच्या कौटुंबिक बैठकीत रुक्सारला मारहाण

कल्याणमधील वालधुनी परिसरात कौटुंबिक वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक नगर भागात राहणाऱ्या रुक्सार हिच्यावर तिचा पती तन्वीर खान, सासरा, दीर आणि नणंद यांनी मिळून हल्ला केल्याचा आरोप आहे. तलाक संदर्भात चर्चा करण्यासाठी दोन्ही कुटुंबीयांची बैठक झाली होती. मात्र, या बैठकीत वाद चिघळला आणि रुक्सारला मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. यानंतर रुक्सार आणि तिचा भाऊ अस्लम तक्रार देण्यासाठी महात्मा फुले पोलीस ठाण्याकडे गेले. मात्र, पोलीस ठाण्याबाहेरच आरोपींनी त्यांच्यावर चाकू आणि दगडाने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत दोघांनी स्वतःचा जीव वाचवत पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी त्यांचा पाठलाग करत पोलीस ठाण्याच्या आवारापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा - Amravati News : एक तरुण, 180 मुली, 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल; अमरावतीत खळबळ

या हल्ल्यात रुक्सार आणि अस्लम या दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर मीरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, महात्मा फुले पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी पती तन्वीर खान याला अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर हद्दपारीची कारवाईही करण्यात आली होती. सध्या सासरा आणि दीर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com