अमजद खान, मनोज सातवी | NDTV मराठी
लहान मुलांचे अपहरण करुन नेणाऱ्या टोळीचं बिंग आपआपसातील भांडणामुळे फुटलं आहे. याच भांडणातून दोन लहान मुले सुदैवाने या टोळीच्या तावडीतून सुटले आहेत. चोरी आणि भीक मागण्याच्या उद्देशाने दोन लहान मुलांचं या टोळींना अपहरण केलं होतं. याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ येथे राहणारे अखिलेश प्रसाद मिश्रा यांची दोन मुले सूरज (9 वर्ष) आणि सत्यम (6 वर्ष) अचानक घरातून बेपत्ता झाले होते. दोन्ही मुले कल्याणला आली असल्याची माहिती वडिलांना मिळाली होती. याबाबत कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांकडे अखिलेश प्रसाद मिश्रा यांनी तक्रार दिली. कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विनोद पाटील यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला.
(नक्की वाचा- जादूटोणा, काळी जादू, करणी अन् 84 लाखाचा गंडा, कोल्हापुरात भयंकर घडलं)
तपासाच्या आधारे पोलिसांनी 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासले. दोन्ही मुले कल्याण बस डेपोतून एका बसमधून निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान पालघर येथील चारोटी नाका परिसरात गरबा सुरु असताना काही महिला-पुरुष पैशांसाठी भांडत होते. त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी भांडण करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. या चौघांसोबत दोन लहान मुले देखील होती. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी या लहान मुलांची चौकशी केली. त्यावेळी लहान मुलांना त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितलं.
पोलिसांना दोन्ही मुलांना कासा पोलीस ठाण्यात आणले. तिथे आल्यानंतर पोलिसांनी सूरजकडे चौकशी केली असता त्याला वडिलांचा फोन नंबर पाठ होता. पोलिसांनी तातडीने अखिलेश यांना फोन केला. आपली दोन्ही मुले सुरक्षित असल्याचं ऐकून अखिलेश यांना अश्रू अनावर झाले.
(नक्की वाचा - - मविआच्या 96-96-96 फॉर्म्यूल्या मागचे सत्य काय? पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले)
कासा पोलिसांनी चारही आरोपींना कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. विनोद गोसावी, आकाश गोसावी, अंजली गोसावी आणि चंदा गोसावी अशी या चौघांची नावे आहेत. हे चौघे सांगली येथील मिरज येथे राहणारे आहेत. दोन्ही महिला आणि पुरुष हे सराईत चोरटे आहे. मुलांचे अपहरण करुन या मुलांकडून चोरी आणि भीक मागण्यास लावणार होते, अशी कबूली त्यांनी दिली. या चौघांनी असाच प्रकार अन्य कोणासोबत केला आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.