
राज्यातील अनेक तरुणांचं परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न असतं. पण, प्रत्येकाचंच हे स्वप्न पूर्ण होत नाही. तरुणांच्या या स्वप्नांना राज्य सरकारकडून बळ मिळालं आहे. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यू सिटी' मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याशिवाय चित्रपट उद्योग क्षेत्रात झालेले करार चित्रपट निर्मिती क्षेत्राला अधिक उंचीवर नेतील, असेही त्यांनी सांगितले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
8,000 कोटींचे करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज् 2025 परिषदेमध्ये आठ हजार कोटी रुपयांचे वेगवेगळे सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी सिडकोमार्फत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर प्रत्येकी 1500 कोटी रुपयांचा करार करण्यात आला. तसेच राज्याच्या उद्योग विभागामार्फत प्राईम फोकस कंपनी सोबत 3000 कोटी रुपयांचा आणि गोदरेज सोबत 2000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगातील दोन सर्वोत्तम विद्यापीठांसोबत सामंजस्य करार होत आहे. नवी मुंबईत सुरू होत असलेल्या ‘एज्यू सिटी' मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकाच ठिकाणी येतील. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे.
( नक्की वाचा : सरकारी सेवांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय,15 ऑगस्टची डेडलाइन हुकल्यास अधिकाऱ्यांना दंड होणार )
जगभरात भारतीय चित्रपटसृष्टी आणि कला यांची मोठी लोकप्रियता आहे. आपल्याला सर्वोत्तम व्हायचे आहे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे आहे आणि आपल्या प्रतिभावान तंत्रज्ञांच्या कौशल्यातून नवनिर्मिती करायची आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, प्राईम फोकस आणि गोदरेज यांच्यासोबतच्या करारांमुळे आपले उद्दिष्ट पूर्ण होईल. विश्वास, गुणवत्ता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या निवडक कंपन्यांमध्ये ‘गोदरेज'चे नाव अग्रगण्य आहे. गोदरेज कडून उभारला जाणारा स्टुडिओ सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
करार झालेल्या सर्व संस्थांना राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
( नक्की वाचा : Caste census : जातीनिहाय जनगणना म्हणजे काय? ती घेण्याची वेळ का आली? वाचा सर्व प्रश्नांची उत्तर )
एनएसई इंडायसेसकडून 'निफ्टी वेव्हज् इंडेक्स' चा शुभारंभ
‘एनएसई इंडायसेस लिमिटेड'ने मुंबईत आयोजित व्हेव्ज 2025 या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हर्चुअल बेल वाजवून 'निफ्टी वेव्हज् इंडेक्स' चा शुभारंभ केला. ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स'च्या माध्यमातून या कंपन्यांमध्ये जगभरातील गुंतवणूक होईल. निफ्टी वेव्हज् इंडेक्स मध्ये मीडिया, मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रातील 43 सूचीबद्ध कंपन्या समाविष्ट आहेत.
भारताच्या सर्वात गतिशील क्षेत्रांपैकी एक असलेल्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य ‘निफ्टी वेव्हव्ज'च्या माध्यमातून झाल्याचा अभिमान वाटत आहे, असा विश्वास एनएससीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी यावेळी व्यक्त केला.
‘सिडको'चा महत्त्वाचा करार
सिडकोमार्फत नवी मुंबई येथे एज्युसिटी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) आणि इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (University of York) यांचे कॅंपस स्थापन करण्याच्या उद्देशाने दोन्ही संस्थांशी स्वतंत्रपणे प्रत्येकी 1500 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
सिडकोच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया'च्या वतीने कुलगुरू डॉ. डायने स्मिथ-गॅंडर आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क'च्या वतीने कुलगुरू व अध्यक्ष चार्ली जेफ्री यांनी करारावर स्वाक्षरी केली.
उद्योग विभागामार्फत ‘प्राईम फोकस' आणि ‘गोदरेज' यांच्यासोबत करार
उद्योग विभाग आणि ‘प्राईम फोकस' तसेच ‘गोदरेज फंड मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपन्यांशी स्वतंत्रपणे सामंजस्य करार करण्यात आले.
‘प्राईम फोकस' सोबत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार करण्याच्या दृष्टीने करार करण्यात आला असून यामध्ये प्रस्तावित गुंतवणूक ३००० कोटी रुपये असणार आहे. या माध्यमातून सुमारे 2500 लोकांना थेट रोजगार उपलब्ध होईल. हा प्रकल्प 2025-26 मध्ये सुरू होईल.
तर ‘गोदरेज' सोबत पनवेल येथे एए स्टुडिओ स्थापन करण्याबाबत करार झाला. या कराराचा पहिला टप्पा 500 कोटी रुपये गुंतवणुकीचा असून याद्वारे (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) 600 रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प 2027 मध्ये सुरू होईल. पुढील टप्प्यात 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून यामध्ये 1900 रोजगार निर्मिती होईल तर हा टप्पा 2030 पर्यंत सुरू होईल. या माध्यमातून एकूण 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 2500 रोजगार निर्मिती होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world