देवा राखुंडे, प्रतिनिधी
Pune Indapur Latest News : इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात जलसंपदा विभागाने उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली आहे.उजनी जलाशयाच्या भूसंपादन क्षेत्रात बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून काही लोकांनी व्यवसाय सुरु केले. या अतिक्रमणांबाबत संबंधित प्रशासनाकडून वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.परंतु,नोटिसांकडे दुर्लक्ष करत अतिक्रमणात वाढ झाल्याने अखेर आज बुलडोझरच्या साहाय्याने धडक कारवाई करण्यात आली.
भिगवण –राशीन रोडलगत करण्यात आलेल्या या कारवाईत वीटभट्या,घरे व दुकाने पाडण्यात आली.जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता नितीन मधुकर खाडे यांनी वारंवार नोटिसा दिल्यानंतरही अतिक्रमण हटवले गेले नाही. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्राचे संरक्षण आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जलसंपदा विभागाने दिले कारवाईचे आदेश
मिळालेल्या माहितीनुसार,जलसंपदा विभागाचे मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील (महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ)यांचे निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर खांडेकर,कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन भिमानगर सुचिता डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता भीमा उपसा सिंचन उपविभाग क्रमांक चार नितीन खाडे यांच्यासह उपविभागीय स्तरावरील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
नक्की वाचा >> महिला कंडक्टरचे आक्षेपार्ह व्हिडीओ, PMPML ने नोटीस धाडलेला पुण्यातील इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे आहे तरी कोण?
प्रशासनाने सूचना देऊनही अतिक्रमण हटवले नाही
भिगवण येथील प्रवीण चौंडकर आणि भापकर यांच्याकडून उजनी जलाशयात निळ्या पूररेषेत प्रत्यक्ष भराव टाकून हे अतिक्रमण करण्यात आले होते.अतिक्रमण धारकांना प्रशासनाकडून अतिक्रमण न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु तरीदेखील संबंधितांनी या ठिकाणी अतिक्रमण सुरूच ठेवले. यानंतर उपविभागीय अभियंता यांच्याकडेही तक्रार दाखल करण्यात आली. पंरतु, परिस्थिती जैसे थेच राहिली.
नक्की वाचा >> Pune News: अरारारारा! जेजुरी गडावर भरला गाढवांचा बाजार, भारतातील 'या' गाढवाला मिळाली सर्वात मोठी किंमत
यानंतर जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार शनिवारी 3 जानेवारी 2026 रोजी या अतिक्रमणावर जलसंपदा विभागाकडून बुलडोजर फिरवण्यात आला.उर्वरित अतिक्रमण धारकांनावर पुढील कारवाई लवकरच केली जाणार असून उजनी जलाशय लगतचे इतर सर्व अतिक्रमण देखील हटविण्यात येणार आहे,अशी माहिती उपविभागीय अभियंता नितीन खाडे यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world