
रेवती हिंगवे, पुणे
Pune Crime News : दसऱ्याच्या दिवशी मुलाने वडिलांचा हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात कोथरूड परिसरात उघडकीस आली आहे. जय भवानीनगरमध्ये मुलाने वडिलांचा चाकूने वार करत खून केला. सचिन तानाजी पायगुडे असं आरोपी मुलाचे नाव आहे. तर तानाजी पायगुडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
कोथरूड पोलिसांनी आरोपी मुलगा सचिन तानाजी पायगुडे (वय 33) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तानाजी यांची पत्नी सुमन तानाजी पायगुडे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
(नक्की वाचा- लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमधील हृदयद्रावक घटना)
पायगुडे कुटुंब जय भवानी नगर येथील चाळ क्रमांक दोनमध्ये वास्तव्यास आहे. दसऱ्याच्या दिवशी, दुपारी साधारणपणे 12 वाजता सचिन हा माळ्यावर टीव्ही पाहत बसला होता. त्यावेळी वडील तानाजी यांनी त्याला "टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक" असे सांगितले.
यावरून दोघा बापलेकात वाद झाला. रागाच्या भरात सचिन याने वडिलांवर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला केला. त्याने तानाजी यांच्या तोंडावर आणि गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांचा या हल्ल्यानंतर जागीच मृत्यू झाला.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: बोटे छाटली, मनगट कापलं; दोन लहानग्यांसमोरच वडिलांची क्रूरपणे हत्या)
घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतले. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सणाच्या दिवशीच घराघरात आनंदाचे वातावरण असताना जय भवानी नगरमध्ये घडलेल्या या खुनाच्या घटनेने नागरिकांत मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world