माहीम विधानसभेच्या जागेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना आमने-सामने आले आहेत. माहीम विधानसभा निवडणुकीत मनसेकडून अमित ठाकरे रिंगणात आहेत. तर शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे निवडणूक लढवत आहेत. सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी अशी अपेक्षा वर्तवली जात होती. मात्र सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, "लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आमच्यासोबत होते . त्यांच्याशी विधानसभा निवडणुकीबाबत बोललो तेव्हा ते म्हणाले की, आधी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचं ठरू द्या. मात्र त्यांना कोणतीही चर्चा न करता थेट उमेदवार उभे केले.
सदा सरवणकर दोन-तीन वेळा माहीममधून आमदार आहेत. शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांचे कार्येकर्ते निवडणूक लढवण्यासाठी आक्रमक आहेत. निवडणूक लढताना कार्यकर्त्यांचे मनोबल खचू देऊ नये, हे नेत्याचं काम आहे."
(नक्की वाचा- माहीममध्ये नवा ट्विस्ट, बाळासाहेबांचं नाव घेऊन सदा सरवणकरांची राज ठाकरेंना साद)
मनसेची मुख्यमंत्र्यावर टीका
"राज ठाकरे यांचा स्वभाव प्रचंड वेगळा आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव घेऊन एकनाथ शिंदे किंवा महायुतीकडे गेलेलो नाही. मात्र आम्ही ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता, त्याची परतफेड म्हणून तरी या लोकांनी माहीम मतदारसंघात विचार करायला हवा होता. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संकुचित विचारांचे आहेत हे यावरून सिद्ध होते", अशी टीका मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली.
( नक्की वाचा : अमित ठाकरेंबाबत मुख्यमंत्र्यांच्या मनात काय? फडणवीसांनी केला गौप्यस्फोट )
महायुतीनं पाठिंबा द्यावा भाजपाची भूमिका
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवतायत. त्यांना महायुतीनं पाठिंबा द्यावा ही भाजपाची भूमिका आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी ती बोलून देखील दाखवलीय.