SSC Exam 2026 Major Reform : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 10 वीच्या (SSC) विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 च्या बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपासून आता गुणपत्रिका (Mark-sheet) आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing Certificate) या दोन वेगळ्या दस्तऐवजांऐवजी एकच एकत्रित दस्तऐवज देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा कागदपत्रे सांभाळण्याचा त्रास कमी होणार असून प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुटसुटीत होणार आहे.
'नावाचा' फॉरमॅट आता बदलला
बोर्डाचे सचिव दीपक माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमाणपत्रावरील नावाच्या क्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. पूर्वी प्रमाणपत्रावर प्रथम आडनाव, त्यानंतर स्वतःचे नाव आणि वडिलांचे नाव असायचे. आता सुधारित नियमानुसार, प्रथम विद्यार्थ्याचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असे स्वरूप असेल. हे स्वरूप अधिक सुसंगत आणि स्पष्ट असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.
(नक्की वाचा- Arjun Tendulkar: वडील सचिन तेंडुलकर नाही तर...; हा खेळाडू आहे अर्जुनचा आदर्श)
विद्यार्थ्यांना फोटो बदलता येणार
विद्यार्थ्यांच्या तपशिलात, विशेषतः फोटोंमध्ये कोणतीही चूक राहू नये यासाठी शाळांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. जर हॉल तिकीट किंवा बोर्डाच्या रेकॉर्डवर विद्यार्थ्याचा फोटो अस्पष्ट असेल, तर तो त्वरित बदलून शाळेच्या मुख्याध्यापकांकडून साक्षांकित (Attested) करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांची नावे आणि फोटोंची पडताळणी सध्या युद्धपातळीवर सुरू असून मुख्याध्यापकांना हे काम तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन
मंडळ सचिव दीपक माळी यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकीट काळजीपूर्वक तपासण्याचे आवाहन केले आहे. जर नावाच्या स्पेलिंगमध्ये किंवा फोटोमध्ये काही त्रुटी आढळल्यास, विद्यार्थ्यांनी त्वरित आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून त्या दुरुस्त करून घ्याव्यात, जेणेकरून अंतिम प्रमाणपत्रावर कोणतीही चूक येणार नाही.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar News: अजिंठा लेणी पाहायला गेलेल्या पर्यटकांची अचानक पळापळ, 11 पर्यटक जखमी)
रेकॉर्ड सांभाळणे होणार सोपे
दोन वेगवेगळी प्रमाणपत्रे हाताळण्याऐवजी आता एकाच दस्तऐवजात सर्व माहिती उपलब्ध असल्याने, उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना किंवा नोकरीसाठी अर्ज करताना पडताळणीची प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे.