जाहिरात

ST Bus: एसटी मोठ्या आर्थिक संकटात! सेवा ठप्प होण्याची भीती; 633 कोटींची देणी थकली

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती कमालीची खालावली असून, दैनंदिन खर्चासाठी निधी शिल्लक नसल्याने एसटी सेवा ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ST Bus: एसटी मोठ्या आर्थिक संकटात! सेवा ठप्प होण्याची भीती; 633 कोटींची देणी थकली

एसटी महामंडळ सध्या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे. इंधन, गाड्यांची दुरुस्ती आणि इतर दैनंदिन खर्चासाठी महामंडळाकडे आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने आगामी काळात राज्यातील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. 'महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस'चे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी या गंभीर परिस्थितीबाबत प्रशासनाला आणि सरकारला इशारा दिला आहे. एसटी महामंडळाकडे सध्या टोल, डिझेल, सुटे भाग पुरवठादार, गाड्यांची देखभाल-दुरुस्ती तसेच भाडेतत्त्वावरील बसेसची मोठी देयके प्रलंबित आहेत.

कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापून घेतलेली रक्कमही संबंधित संस्थांकडे जमा करण्यात आलेली नाही. डिसेंबर 2025 ते मे 2026 या अवघ्या 6 महिन्यांच्या कालावधीत कर्मचाऱ्यांची तब्बल 633 कोटी 2 लाख रुपयांची देणी थकीत आहेत. 

(नक्की वाचा-  JD Vance यांच्या भारत-पाकिस्तानातील 2 आवडत्या व्यक्ती; एक आसिम मुनीर, तर भारतीय व्यक्तीचं नाव चकीत करणारं)

या थकीत रकमांमध्ये भविष्य निर्वाह निधी (PF), ग्रॅच्युईटी, रजा रोखीकरण, वैद्यकीय व प्रवास भत्ते, कर्मचाऱ्यांच्या बँक कर्जाचे हप्ते या बाबींचा समावेश आहे. महामंडळासमोर दर महिन्याला वाढणारी आर्थिक तूट हे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. या सातत्याने वाढणाऱ्या तुटीमुळे एसटीचा गाडा पुढे कसा हाकायचा, असा यक्षप्रश्न आता एसटी व्यवस्थापनासमोर उभा ठाकला आहे.

आज विधान भवनात होणाऱ्या बैठकीकडे लक्ष

या सर्व आर्थिक कोंडीच्या पार्श्वभूमीवर, आज सोमवारी विधान भवनात सर्व श्रमिक संघटनांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लागणारा निधी, आंदोलनाच्या नोटिशीतील प्रलंबित 1 टक्का वार्षिक वेतनवाढ, वाढीव महागाई भत्ता (DA), आणि घरभाडे भत्ता फरक यांसारख्या विविध आर्थिक मागण्यांवर विस्तृत चर्चा होणार आहे. या बैठकीत सरकार काय तोडगा काढणार, याकडे आता संपूर्ण राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com