योगेश लाठकर, प्रतिनिधी
महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) ही महत्त्वाकांक्षी योजना आणली. या योजनेतील लाडक्या बहिणींना निवडणुकीपूर्वी पैसे मिळतील याचीही सरकारने दक्षता घेतली. पण याच लाडक्या बहिणींचे पैसे चक्क लाडक्या भावांच्या बँक खात्यात जमा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हा आहे सय्यद आलिम. सय्यद हा हदगाव तालुक्यातील मनाठा या गावचा रहिवासी आहे. नुकतच सय्यदल त्याच्या मोबाइलवर बँक खात्यात साडेचार हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. हे पैसे कशाचे आले म्हणून त्याने बँकेत खात्री केली तेव्हा हे पैसे लाडकी बहीण योजनेचं असल्याचं त्याला कळालं.
या गावात एक सुविधा केंद्र आहे. हे सुविधा केंद्र सचिन थोरात नावाचा व्यक्ती चालवतो. याच सचिनने लाडकी बहीण योजनेचे अनेकांचे फॉर्म भरले. यातील काही फॉर्म भरताना त्याने माहिती महिलांची भरली अन् बँक खाते मात्र पुरुषांचे टाकले. या घोळामुळे लाडक्या बहिणींचे पैसे भावांच्या बँक खात्यात जमा झाले. सुविधा केंद्र चालकाने एक फर्मान सोडले. हे पैसे त्याचे असून रोजगार हमी योजनेचे आहेत, पण चुकून तुमच्या खात्यात आल्याने ते परत करा असे फर्मान सोडले. त्यामुळे बिचाऱ्या लोकांनीही ते पैसे सुविधा केंद्र चालकाला परत केले. हा घोळ सुमारे तीन लाखांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नक्की वाचा - मुंबई-पुणे अंतर कमी होणार? एक्स्प्रेस वेवरील या प्रकल्पामुळे अपघातातही घट होणार?
योजनेतील हा प्रकार समजताच प्रशासनाने लाभार्थीचं बँक खाते क्रमांक दुसरेच टाकत असल्याचं सांगत या सुविधा केंद्र चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. ही योजना कितीही चांगली असली तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. नेमक्या याच त्रुटींचा फायदा घेत काही महाभाग स्वतःचं चांगभलं करून घेत असल्याचं समोर येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world