जाहिरात

Ladki Bahin Yojna : 'लाडकी बहीण' योजनेत मोठा घोटाळा? 26 लाखांहून जास्त महिलांची होणार पडताळणी

Ladki Bahin Yojna Scam : राज्य सरकारने 26.30 लाख महिला लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्याची मोहीम सुरू केली आहे.

Ladki Bahin Yojna : 'लाडकी बहीण' योजनेत मोठा घोटाळा? 26 लाखांहून जास्त महिलांची होणार पडताळणी
Ladki Bahin Yojna Scam : पडताळणी कर्मचाऱ्यांचा बराच वेळ आणि पैसा वाया जात आहे.
पुणे:

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहिण' योजनेत झालेल्या कथित गैरव्यवहारानंतर, राज्य सरकारने 26.30 लाख महिला लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना शोधून काढणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या पडताळणीची जबाबदारी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे.

माहिती तंत्रज्ञान विभागाने केलेल्या प्राथमिक विश्लेषणात अनेक अनियमितता आढळल्यानंतर ही व्यापक पडताळणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी योजनेत नोंदणी केल्याचे, वयाच्या निकषांचे उल्लंघन झाल्याचे आणि काही प्रकरणांमध्ये पुरुषांनीही खोट्या पद्धतीने लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

पडताळणीत अडचणी

या पडताळणी मोहिमेत अंगणवाडी सेविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शहरी भागात, सरकारकडून मिळालेल्या यादीत केवळ शहर आणि जिल्ह्याचे नाव आहे, संपूर्ण पत्ता नाही. यामुळे खऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेणे अत्यंत अवघड झाले आहे. अनेक पत्त्यांवर घरमालक सापडत नाहीत किंवा पत्ते चुकीचे आहेत. यामुळे पडताळणी कर्मचाऱ्यांचा बराच वेळ आणि पैसा वाया जात असून, दीड महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

( नक्की वाचा : Beed News : रेल्वेच्या शिट्टीची प्रतीक्षा संपली! बीड रेल्वे स्टेशन दिमाखात उभे, काम अंतिम टप्प्यात )
 

तपासणीचे मुख्य निकष

विभागीय अधिकाऱ्यांनुसार, ही पडताळणी अनेक महत्त्वाच्या निकषांवर आधारित आहे. यामध्ये लाभार्थ्यांचे वय, कुटुंबातील एकूण लाभार्थींची संख्या, वार्षिक उत्पन्न आणि कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे की नाही याची तपासणी केली जात आहे. 'माझी लाडकी बहिण' योजनेनुसार, एका कुटुंबातील फक्त 2 महिलांना लाभ मिळू शकतो. यासाठी त्यांचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

पडताळणी पथके प्रत्येक घरात जाऊन कुटुंबाची संपूर्ण माहिती गोळा करत आहेत. यात वैवाहिक स्थिती, रोजगार तपशील आणि कुटुंबातील सदस्यांची रचना यासंबंधी प्रश्न विचारले जात आहेत. कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का, कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत नाहीये ना, कुटुंबाचे उत्पन्न मर्यादापेक्षा जास्त नाही ना आणि लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी नाही ना, याची खात्री केली जात आहे. या पडताळणीतून आतापर्यंत अनेक नियमबाह्य गोष्टी उघड झाल्या आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com