Mumbai News: मुंबईत मुसळधार पावसानंतर आता साथीच्या आजारांचे संकट गडद होऊ लागले आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) जाहीर केलेल्या जुलै महिन्याच्या आजार पाहणी अहवालानुसार, शहरात जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. पावसामुळे जागोजागी साचणारे पाणी आणि डासांच्या पैदाशीमुळे हे प्रमाण वाढल्याचे बीएमसीच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
जुलै महिन्यातील आजारांची आकडेवारी
- मलेरिया (Malaria): जूनमधील 655वरून जुलैमध्ये थेट 1380 रुग्णांपर्यंत वाढ.
- डेंग्यू (Dengue): जूनमधील 266 वरून 466 रुग्णांपर्यंत वाढ.
- गॅस्ट्रोएन्टेरिटिस : जूनमधील 603 वरून 851 रुग्णांपर्यंत वाढ.
- स्वाइन फ्लू (H1N1 Swine Flu): जूनमधील 58 वरून 105 रुग्णांपर्यंत वाढ.
- लेप्टोस्पायरोसिस : जूनमधील 33 वरून 78 रुग्णांपर्यंत वाढ.
- कोविड-19 : जूनमधील 27 वरून 58 रुग्णांपर्यंत वाढ.
- चिकनगुनिया: दोन्ही महिन्यांत 7 रुग्णांवर स्थिर.
(नक्की वाचा- Ajinkya Rahane: क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही रहाणेला BCCI कडून मिळणार दरमाह एवढी रक्कम)
बीएमसीची 'झिरो मॉस्किटो ब्रीडिंग' मोहीम अन् मोठी कारवाई
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीएमसी प्रशासनाने मुंबईभरात विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. मलेरिया नियंत्रणासाठी 54,605 संभाव्य पैदास ठिकाणांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये 'ॲनोफिलीस' डासांची 5969 पैदास स्थळे आढळली. डेंग्यू नियंत्रणासाठी 10,91,315 ठिकाणांची तपासणी करून 'एडीस' डासांची 21,924 पैदास स्थळे शोधून ती नष्ट करण्यात आली.
पाणी साचू शकणारे 2535 जुने टायर्स आणि 64,596 स्क्रॅप साहित्य नष्ट करण्यात आले. 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान बीएमसी आरोग्य कर्मचाऱ्यांनी 6.59 लाखांहून अधिक घरांचे सर्वेक्षण करून 75,650 रक्ताचे नमुने गोळा केले, तर 51,216 नागरिकांना लेप्टोस्पायरोसिसची प्रतिबंधात्मक औषधे दिली.
(नक्की वाचा- 'लोहगड हत्या' प्रकरणानंतर लग्न जुळवण्याची पद्धतच बदलली? नव्या ट्रेंडची धक्कादायक माहिती समोर)
प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी बीएमसीने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:
- पाणी साचू देऊ न: घर आणि परिसरातील कुंड्या, ड्रम, टायर किंवा कुलरमध्ये पाणी साचू देऊ नका.
- डासांपासून बचाव:** रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधक क्रीम/मशीनचा वापर करा.
- उकळलेले पाणी प्या: पिण्याचे पाणी उकळून आणि गाळून प्या.
- पाण्यातून चालणे टाळा: साचलेल्या पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा; चालावे लागल्यास पाय स्वच्छ धुवा.
- स्वतः औषधे घेऊ नका: ताप किंवा लक्षणे आढळल्यास स्वतःच्या मनाने औषधे न घेता तातडीने जवळच्या महापालिका दवाखान्यात किंवा डॉक्टरांकडे जा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world