ऋतिक गणकरवार, मुंबई
मुंबईतील गिरगाव परिसरात फुटपाथवर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांचा वाद आता अधिक चिघळला आहे. या पांढऱ्या पट्ट्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करणाऱ्या आणि अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कायदेशीर बडगा उगारला आहे. सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी मनसे सैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे गिरगावातील राजकीय वातावरण तापले असून, मनसेने पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
करड्या रंगाचा स्प्रे मारून आंदोलनाचा प्रयत्न
गिरगावातील फुटपाथवर अचानक मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि पादचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मनसेने या पांढऱ्या पट्ट्यांना 'अवैध' म्हणत पहिल्यापासूनच जोरदार विरोध दर्शवला होता. मनसेचे स्थानिक कार्यकर्ते या फुटपाथवरील पांढऱ्या पट्ट्यांवर करड्या रंगाचा स्प्रे मारून ते पुसून टाकण्याच्या आणि प्रशासनाचा निषेध करण्याच्या तयारीत होते.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
मनसे कार्यकर्ते आंदोलनासाठी एकत्र आलेले असतानाच, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखले. पोलिसांनी आंदोलनकर्त्या मनसैनिकांना तात्काळ ताब्यात घेतले. अधिकृत आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे सुसाट! अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार प्रवास; रेल्वे मंत्रालयाचा मास्टरप्लॅन)
विनापरवानगी पट्टे मारणारे मोकळे का?
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मनसेच्या स्थानिक नेत्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. "आम्ही जनतेच्या हक्कासाठी आणि फुटपाथ मोकळा ठेवण्यासाठी आंदोलन केले, तर आमच्यावर तातडीने गुन्हे दाखल केले जातात. मात्र, कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय, सार्वजनिक रस्त्यावर आणि फुटपाथवर हे पांढरे पट्टे मारणारे नेमके कोण आहेत? बेकायदेशीरपणे पट्टे मारून फुटपाथ अडवणाऱ्यांवर पालिका किंवा पोलिसांनी अद्याप एकही कारवाई का केली नाही? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world