विशाल पाटील, मुंबई
मुंबईतील 100 वर्षांहून अधिक काळाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालयाचे नाव बदलण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही, अशी महत्त्वाची माहिती राज्य शासनाने दिली आहे. विधानपरिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील शिंदे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती लेखी स्वरूपात सभागृहात मांडली. केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावावरून सध्या मुंबईसह वैद्यकीय क्षेत्रात तीव्र पडसाद उमटत आहेत.
मंगलप्रभात लोढा यांच्या प्रस्तावावर आक्षेप
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएम रुग्णालयाचे नाव बदलून ते 'कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' करावे, असा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला स्थगिती देण्याची मागणी आमदार मिलिंद नार्वेकर आणि सुनील शिंदे यांनी सभागृहात केली.
(नक्की वाचा- Pune: दुर्घटना नव्हे हत्या! होणाऱ्या पत्नीनेच केतनला लोहगडावरून दरीत ढकललं, पोलिसांना संशय, कारण काय?)
आमदारांनी उपस्थित केलेले मुख्य मुद्दे
- केईएम रुग्णालयाला 100 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे, नाव बदलल्याने हा वारसा पुसला जाईल.
- जगभरात हे रुग्णालय 'केईएम' याच नावाने प्रसिद्ध असल्याने मूळ नाव कायम ठेवावे.
- रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची नामांकित संघटना 'मार्ड'ने देखील या नामांतराला अधिकृतपणे विरोध दर्शवला आहे.
(नक्की वाचा- Pune News: पाणीटंचाईमुळे पाण्याचे दुर्भिक्ष! त्यात नवी अडचण, पुणेकरांचं टेन्शन वाढलं)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लेखी उत्तर
आमदारांच्या या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले की, "केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यासंदर्भात मंत्र्यांकडून मुंबई महानगरपालिकेकडे विनंती प्राप्त झाली आहे, हे खरे आहे. मात्र, महापालिकेकडून अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही."
प्रशासनाकडून कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे तूर्तास या नामांतराच्या प्रस्तावाला स्थगिती देण्याचा किंवा पुढील कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. 'केईएम' ही मुंबईची जागतिक ओळख असल्याने त्याचे नाव बदलू नये, हीच मुंबईकरांची आणि डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world