जाहिरात

Pune News: पाणीटंचाईमुळे पाण्याचे दुर्भिक्ष! त्यात नवी अडचण, पुणेकरांचं टेन्शन वाढलं

Pune water Shortage News: पुण्यातील गंभीर पाणीटंचाईमुळे खाजगी टँकरच्या दरांमध्ये 30% ते 60% टक्क्यांपर्यंत प्रचंड वाढ झाली आहे.

Pune News: पाणीटंचाईमुळे पाण्याचे दुर्भिक्ष! त्यात नवी अडचण, पुणेकरांचं टेन्शन वाढलं

Pune News: यंदा मान्सून लांबल्यामुळे पुणे शहरावर पाण्याचे भीषण संकट ओढावलं आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. याचाच गैरफायदा घेत पुण्यातील खाजगी टँकर चालकांनी दरांमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. अवघ्या दोन दिवसांत टँकरचे दर गगनाला भिडल्याने सोसायट्या आणि सामान्य पुणेकरांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. पुणे महानगरपालिकेने (PMC) परिस्थिती हाताळण्यासाठी काही भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. परंतु त्यामुळे टँकरवरील अवलंबित्व अधिकच वाढले आहे.

पुण्यातील कोणत्या भागात किती वाढले टँकरचे दर?

उंड्री आणि महंमदवाडी 
आधीचे दर - 900 ते 1200
वाढलेले दर - 1500

बाणेर आणि बावधन 
आधीचे दर -1000 
वाढलेले दर- 1500

बिबवेवाडी 
आधीचे दर - 1500
वाढलेले दर- 2000

धायरी-वडगाव खुर्द - 
आधीचे दर - 700 ते 800 
वाढलेले दर- 1200 ते 2000

(नक्की वाचा-  Monsoon Update: मुंबईकरांनो छत्री-रेनकोट तयार ठेवा, अखेर मान्सून धडकणार! हवामान विभागाची मोठी अपडेट)

टँकर चालकांचे कारण काय? 

टँकर असोसिएशन आणि पुरवठादारांच्या मते, स्थानिक पातळीवर विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडल्यामुळे त्यांना पाणी आणण्यासाठी खूप लांबचा प्रवास करावा लागत आहे. टँकर भरण्यासाठी लांब जावे लागत असल्याने अतिरिक्त डिझेलचा खर्च निघून कसाबसा नफा उरावा, म्हणून दर वाढवावे लागले आहेत.

धायरी-वडगाव खुर्द भागात परिस्थिती इतकी बिकट आहे की, एका विहिरीवरून पूर्वी दिवसाला 10 ते 12 टँकर भरले जायचे, तिथे आता जेमतेम 5 टँकर भरले जात आहेत. पाणी भरण्याच्या ठिकाणी 10 ते 15 टँकर्सच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

महापालिकेच्या मोफत टँकरसाठी वेटिंग

पुणे महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या मोफत टँकर सेवेवर नागरिकांच्या उड्या पडत आहेत. धायरी परिसरात महापालिकेच्या टँकरसाठी तब्बल 150 हून अधिक नागरिकांची वेटिंग लिस्ट आहे. पालिकेचा टँकर मिळवण्यासाठी नागरिकांना दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागत आहे. 

खडकवासला धरणात केवळ 4 टीएमसी साठा

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या धरणांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. टेमघर धरण आधीच कोरडे पडले असून, सर्व धरणांमध्ये मिळून आता केवळ 4 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले की, "या टंचाईच्या काळात खाजगी टँकर चालकांच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांची लूट थांबवण्यासाठी आम्ही एका 'SOP' वर काम करत आहोत. हा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल." प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी, अद्याप पावसाने हजेरी न लावल्यामुळे आगामी काळात टँकरचे दर आणखी वाढण्याची भीती पुणेकरांना सतावत आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com