Mumbai News: मुंबईत मुसळधार पाऊस, तलावांतील पाणीसाठा वाढला; मुंबईकरांची चिंता मात्र कायम

Mumbai Dam Water Level: मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून एकूण उपयुक्त पाणीसाठा 8.12% वर पोहोचला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई आणि उपनगरांमध्ये मान्सूनने जोरदार हजेरी लावल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख तलावांच्या जलपातळीत काही अंशी वाढ झाली आहे. मुंबईच्या तलावांमध्ये सध्या एकूण 8.12% उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. पुढील काही दिवसांत तलाव क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, पावसाने दमदार पुनरागमन केले असले तरी मुंबईवरील पाणीटंचाईचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. गेल्या वर्षीच्या पाणीसाठ्याची तुलना करता यंदाची स्थिती अजूनही चिंताजनकच मानली जात आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साठा कमी

मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या सातही तलावांमध्ये मिळून एकूण 1.17 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

  • यंदाचा साठा: 8.12% (1.17 लाख दशलक्ष लिटर)
  • गेल्या वर्षीचा साठा: याच काळात गेल्या वर्षी तलावांमध्ये तब्बल 43.46% पाणीसाठा उपलब्ध होता.

यावरून स्पष्ट होते की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तलावांमधील पाणी पातळी अत्यंत खालावलेली आहे. त्यामुळे पाऊस पडत असला, तरी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Shocking News: उकळता गरम चहा प्यायल्याने 12 वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण)

विहार तलावात सर्वाधिक साठा; अप्पर वैतरणा अजूनही 'शून्य'वर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी विहार तलावात सर्वाधिक 57.18% पाणीसाठा जमा झाला आहे. तर दुसरीकडे अत्यंत चिंताजनक बाब म्हणजे, अप्पर वैतरणा तलावातील पाणीपातळी अजूनही एलडीएल खाली असल्यामुळे त्यातील उपयुक्त साठा सध्या 'शून्य' मानला जात आहे.

तलावनिहाय पाणीसाठा 

  • भातसा : 5.72%
  • मोडकसागर : 22.35%
  • मध्य वैतरणा : 12.38%
  • विहार : 57.18%
  • तानसा : 3.60%
  • तुळशी : 33.96%
  • अप्पर वैतरणा : उपयुक्त साठा शून्य

गेल्या 24 तासांत तलाव क्षेत्रात झालेला पाऊस

गेल्या 24 तासांत तलाव क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये तुळशी आणि विहार तलाव क्षेत्रात सर्वाधिक पाऊस झाला आहे. तसेच भांडुप संकुलात गेल्या 24 तासांत 219 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

(नक्की वाचा-  Hingoli News: जमिनीतून गूढ आवाज अन् क्षणात हादरे! हिंगोलीतील नागरिक दहशतीत)

तलाव क्षेत्रनिहाय पाऊस (मिमी)

  • तुळशी : 207 मिमी
  • विहार : 195 मिमी
  • मध्य वैतरणा : 70 मिमी
  • मोडकसागर : 67 मिमी
  • भातसा : 52 मिमी
  • तानसा : 51 मिमी
  • अप्पर वैतरणा : 22 मिमी
     
Topics mentioned in this article