Mumbai Airport: मुंबईला येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज (7 मे) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) तब्बल 6 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कोणतेही विमान उड्डाण (Takeoff) किंवा लँडिंग (Landing) करणार नाही. मुंबई विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक मानले जाते, त्यामुळे या ब्लॉकचा परिणाम हजारो प्रवाशांवर होऊ शकतो. पण प्रवाशांची जास्त गैरसोय होऊ नये यासाठी विमानतळ प्रशासन आणि एअरलाइन्सने आधीच तयारी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ का बंद राहणार?
विमानतळावरील हा निर्णय मान्सूनपूर्व देखभालीच्या (Pre-monsoon maintenance) कामामुळे घेण्यात आला आहे. दरवर्षी पाऊस सुरू होण्यापूर्वी रनवे आणि एअरसाइड परिसराची तपासणी केली जाते, जेणेकरून मान्सूनमध्ये विमानांच्या उड्डाणाची सुरक्षा टिकून राहील आणि प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही. विमानतळ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रनवे 09/27 आणि रनवे 14/32 वर तांत्रिक कामे केली जातील. या दरम्यान धावपट्टीच्या पृष्ठभागाची बारकाईने तपासणी केली जाईल आणि जेथे गरज असेल तिथे तातडीने दुरुस्ती केली जाईल. मुंबईत मान्सूनमध्ये जोरदार पाऊस होतो, खबरदारी म्हणून विमानतळ प्रशासन आधीच तयारी करत आहे. याच कारणामुळे ही देखभाल अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. विमानतळाचा संपूर्ण एअरसाइड परिसर जो सुमारे 1033 एकरमध्ये पसरलेला आहे, त्याचीही तपासणी आणि देखरेख केली जाणार आहे.
एअरलाइन्सनी आधीच बदलले वेळापत्रक
विमानतळ प्रशासनाने सांगितले की, या कामाची माहिती विमान कंपन्या आणि इतर संस्थांना सुमारे सहा महिने आधीच देण्यात आली होती. त्यानंतर अनेक एअरलाइन्सनी आपल्या विमानांच्या वेळा बदलल्या आहेत. काही फ्लाइट्सच्या वेळा मागे-पुढे करण्यात आल्या आहेत, तर काहींचे वेळापत्रक री-स्केड्युल (Re-schedule) करण्यात आले आहे. विमानतळावर पोहोचण्यापूर्वी आपल्या फ्लाइटच्या वेळेचे अपडेट्स नक्की तपासावे, असा सल्ला प्रवाशांना देण्यात आला आहे.
(नक्की वाचा : Pune News: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर कारवाईचा बडगा!3 दिवसात किती गाड्यांवर कारवाई? वसूलीचा आकडा ही समोर)

Photo Credit: NDTV Marathi
विशेष म्हणजे मुंबई विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. येथे दररोज सुमारे 1000 विमानांचे ऑपरेशन होते. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 5.5 कोटींहून अधिक प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला होता. याच कारणामुळे काही तासांसाठी धावपट्टी बंद राहण्याचा परिणाम मोठ्या संख्येने प्रवाशांवर होऊ शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world