जाहिरात

Mumbai News : गिरगावात मराठी माणूस उपाशी, मात्र परप्रांतीय तुपाशी? नेमका काय आहे संघर्ष?

मुंबईतील मराठी संस्कृतीचा, चळवळींचा आणि अस्मितेचा बालेकिल्ला. पण आज याच गिरगावातील चाळींमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाच्या नशिबी अंधार आणि पाण्यासाठी लढण्याची वेळ आली आहे.

Mumbai News : गिरगावात मराठी माणूस उपाशी, मात्र परप्रांतीय तुपाशी? नेमका काय आहे संघर्ष?
AI Image - प्रतिकात्मक फोटो

Mumbai News : मुंबईचं हृदय समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक गिरगावात सध्या एक वेगळाच संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष केवळ वीज आणि पाण्याचा नाही, तर तो आता 'मराठी विरुद्ध गुजराती' अशा जुन्या आणि संवेदनशील वादाकडे झुकताना दिसतोय. चाळीतल्या मराठी माणसाला अंधारात आणि कोरड्या नळांसमोर राहावं लागत असताना, शेजारीच उभ्या राहिलेल्या हायराईज टॉवर्समध्ये मात्र जनरेटरचा प्रकाश आहे. गिरगावातील या नव्या संघर्षावर विशेष रिपोर्ट.

मुंबईतील मराठी संस्कृतीचा, चळवळींचा आणि अस्मितेचा बालेकिल्ला. पण आज याच गिरगावातील चाळींमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाच्या नशिबी अंधार आणि पाण्यासाठी लढण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वीज आणि पाण्याचा गंभीर तुटवडा जाणवतो आहे.

चाळी अंधारात, हायराईज इमारतीत मात्र २४ तास वीज-पाणी

इथे पाणी आणि विजेअभावी नागरिकांचे तर हाल होतच आहेत, पण यामुळे काही लोकांच्या व्यवसायावर देखील परिणाम होत आहे. संस्कृती विवेक पाटील या घरी केकची ऑर्डर घेतात. मात्र सतत वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे त्यांच्या या उद्योगाला फटका बसत आहे आणि आर्थिक नुकसान देखील होत आहे. पण हा प्रश्न केवळ पायाभूत सुविधांचा राहिला नसून त्याला आता प्रांतिक वादाचा रंग येऊ लागला आहे. स्थानिक मराठी रहिवाशांचा आरोप आहे की, एका बाजूला चाळी अंधारात असताना, दुसरीकडे नवनवीन उभ्या राहिलेल्या हायराईज इमारतींमध्ये, जिथे प्रामुख्याने गुजराती भाषिक व्यावसायिक राहतात, तिथे मात्र जनरेटर लावून २४ तास वीज आणि पाण्याची सोय केली जात आहे. यामुळे आपल्याच मुंबईत मराठी माणूस उपरा ठरतोय का? असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. 

नक्की वाचा - दरमहा 30 टक्के परतावा, जुन्या नावाने नवा मेसेज; हजारो गुंतवणुकदार पुन्हा हादरले, मुंबईत पुन्हा त्याची एन्ट्री?

या सगळ्याचा परिणाम इतका आहे की, इथल्या तरुण वर्गाला कामावर दांडी मारायची वेळ येते. सध्या शाळेला सुट्टी आहे. मात्र जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा शाळकरी मुलांचे देखील हाल होतील अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, हा वाद प्रांतिक नसून केवळ तांत्रिक असल्याचा दावा स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे. जुन्या चाळींमधील अंतर्गत वाहिन्यांवर आलेला ताण आणि वाढती मागणी यामुळे हा बिघाड झाल्याचे बोलले जात आहे. हायराईज सोसायटीमध्ये लिफ्टची आवश्यकता असतेच आणि त्यामुळे जनरेटरची सोय त्यांच्यासाठी केलेली असते, असं म्हणणं स्थानिक नगरसेविका स्नेहल तेंडुलकर यांचं आहे. 

मराठी माणसाला विस्थापित करण्याचे राजकारण?

काही दिवसांआधी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या जागेची पाहणी केली आणि जर इथला त्रास रहिवाशांचा कमी झाला नाही तर आंदोलनाची देखील भाषा त्यांनी केली आहे. मात्र जरी सत्तेत असलो तरी लोकांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचं नगरसेविकास स्नेहल तेंडुलकर यांचं म्हणणं आहे. गिरगावातील पाण्याची आणि विजेची समस्या लक्षात घेत बेस्ट प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे. मुंबईने नेहमीच सगळ्यांना सामावून घेतलं, पण जेव्हा मूळ मराठी माणसाच्या मूलभूत हक्कांवर गदा येते, तेव्हा असे संघर्ष डोकं वर काढतात. गिरगावातील हा वीज-पाण्याचा प्रश्न केवळ तांत्रिक बिघाड आहे की, त्यामागे मराठी माणसाला विस्थापित करण्याचे राजकारण? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com