Mumbai News: मुंबईतील ऐतिहासिक आणि कापड बाजाराची शान असलेल्या 'स्वदेशी मार्केट'ला तब्बल 117 वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वदेशी मार्केटचा पुनर्विकास होणारच, अशी मोठी घोषणा केली.
रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं की, "मुंबईतील ऐतिहासिक स्वदेशी मार्केटचा पुनर्विकास हा होणारच, याची मी तुम्हाला खात्री देतो. तसेच या पुनर्विकास प्रक्रियेत स्वदेशी मार्केटच्या कोणत्याही सदस्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची मी तुम्हाला आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने ग्वाही देतो."
मुंबईतील काळबादेवी परिसरात असलेल्या प्रसिद्ध स्वदेशी मार्केटला तब्बल 117 वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक स्थापना दिवसाचे औचित्य साधून एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्धापन दिनानिमित्त स्वदेशी मार्केटच्या 117 वर्षांमधील गौरवशाली प्रवास उलगडणाऱ्या विशेष 'पोस्टल एन्व्हलप'चे अनावरण रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रांतिकारक बाबू गेनू यांच्या बलिदानाचा वारसा
स्वदेशी मार्केटच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकताना रवींद्र चव्हाण म्हणाले, याच स्वदेशी मार्केटच्या काळबादेवी परिसरात इंग्रज सरकार विरोधात स्वदेशीचा नारा देत थोर क्रांतिकारी बाबू गेनू सैद यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. स्वातंत्र्यलढ्यात विदेशी कपड्यांच्या ट्रकला रोखण्यासाठी बाबू गेनू यांनी दिलेले हे बलिदान आपल्याला आजही स्वदेशीसाठी मोठी प्रेरणा व दिशा देते. त्यांचा हा जाज्वल्य वारसा मुंबईच्या प्रसिद्ध कापड बाजारातील 'स्वदेशी मार्केट' ही संस्था गेल्या 117 वर्षांपासून अभिमानाने जपत आहे.
मोदी सरकारच्या 'मेक इन इंडिया' धोरणानुसार राज्याचा विकास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख करत रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले, "या संपूर्ण 12 वर्षांत देशाचा विकास करताना 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' हे तत्त्व मोदीजींनी बाळगले आहे. आपल्या देशात जे जे उत्पादित होते, ते देशभर आणि जगाच्या मार्केटमध्ये कसे पोहोचेल, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील राहिले आहे. तोच दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून आपले राज्य सरकार काम करत असते. त्यामुळे आपल्या राज्याच्या विकासामध्ये आता कोणतीही अडचण येणार नाही."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world